बुलडाणा जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटरने खालावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:08 AM2018-03-19T01:08:23+5:302018-03-19T01:08:23+5:30
बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.
सोहम घाडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.
त्यामुळे मार्च अखेर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्ह्यातील ७४८ गावात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, जिल्हाधिका-यांनी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळी सवलतीचा अर्ध्या जिल्ह्याला फायदा होणार असला तरी पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ८८ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे १८ लाख लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न येत्या काळात जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने सोडवावा लागणार आहे.
वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी ओढ देत हा पाऊस आल्याने आॅक्टोबर अखेर अपेक्षित अशी भूजलपातळी यंदा गाठल्या गेली नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच गेल्या पाच वर्षाचा विचार करता २०१३ मध्ये वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी ही सरासरीमध्ये ०.३९ मीटर दाखवत असली तरी उपरोक्त चार तालुक्यात त्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा ही भूजल पातळी दीड मीटरने खालावली असून, मार्च अखरे ही पाणी पातळी अडीच मीटरने आणखी खोल जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
परिणामी जिल्ह्यातील १०१ पेक्षा अधिक गावांवर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार यात शंका नाही. ग्रामीण पाणीपुरव्याची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही अवघा १२ टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक आहे.
सिंदखेडराजा तालुक्यालाही फटका!
सिंदखेडराजा तालुक्याची भूजल पातळी ही जानेवारीमध्येच गत वर्षीच्या तुलनेत २.३१ मीटरने खोल गेली आहे. मलकापूर तालुक्याचीही २.०१ मीटरने ती खालावली असून, लोणार तालुक्याचीही १.७० मीटरने पाणी पातळी खालावली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वीच घसरलेल्या भूजल पातळीमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात विंधन विहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यात आता लोणार तालुक्याचीही प्रसंगी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याची सध्याची भूजल पातळी ही दीड मीटरने खालावलेली असून, १६७ निरीक्षण विहिरींची पाहणी करून ती काढण्यात आली आहे. मार्च अखेर पुन्हा त्यात घट होण्याची शक्यता आहे.
खामगाव तालुक्यातील चार नळ योजनांची दुरुस्ती
पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव तालुक्यातील खौलखेड, वाडी, घाटपुरी व कोक्ता या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. अन्य योजनांतून या कामासाठी या गावांना निधी भेटलेला आहे किंवा नाही, याची तपासणी करूनच ही कामे करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचित केले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा १९ कोटी रुपयांचा असून, सध्या टंचाई निवारणासाठी विहीर अधिग्रहणावर प्रशासनासह गावांची भिस्त आहे.