बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:03 PM2018-08-12T18:03:24+5:302018-08-12T18:08:33+5:30
औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास होणारे रुग्ण अधिक आहेत. एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसाला १०० ते १५० रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांची ओपीडी ५ हजार २०० च्यावर जात आहे. परंतू औषधांचा तुटवडा व आरोग्य कर्मचारी गावात फिरकत नसल्याने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य यंत्रणेलाच ‘व्हायरल इन्फेक्शन’ जडल्याचे दिसून येत आहे.
गोरगरीब रुग्णांना वेळीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयापेक्षाही प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्र जवळचे वाटतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांची आजही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरच मदार आहे. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा तीन पदांना शासनाने मान्यता दिली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये १५ कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र ५२ असून उपकेंद्र २८० आहेत. परंतू सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ झपाट्याने पसरसत असून रुग्णांची गर्दी वाढली आहे. बदलते हवामान, त्यातच तापाची साथ सर्दी, खोकला यांसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. ढगाळ वातावरणामुळे दमा व त्वचा विकाराचा त्रास वाढला आहे. सध्याचे वातावरण जलजन्य आजाराच्या वाढीसाठी पोषक असल्याने रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिवसाची ओपीेडी १०० ते १५० पर्यंत जात असल्याचे दिसून येत आहे. शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. परंतू अशा परिस्थितीतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गावोगावी फिरकत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी सुद्धा गावांना भेटी देत नाहीत. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधी साठा उपलब्ध नाही, त्यात खोकल्याच्या औषधींचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाºयांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आरोग्य केंद्राचा कारभार उपकेंद्राच्या भरवश्यावर
एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकारी असल्यास एकाला ओपीडी बघावी लागते. तर दुसरा अधिकारी मिटींग किंवा गावांना भेटी देणे व इतर कामे करतो. परंतू जिल्ह्यातील काही आरोग्य केंद्रावरील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदीक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाºयांना केंद्राच्या ठिकाणी बसण्यास सांगतात. अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या वैयक्तीक कामांसाठी उपकेंद्रावरील अधिकाºयांना बालावून त्यांच्यावर कामाचा डोलारा सोपवितात.
अॅन्टी बायोटीकचा तुटवडा
प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधांची कमतरता वारंवर जाणवते. सध्या रुग्णांची संख्या वाढलेली असताना काही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरून माहिती घेतली असता अॅन्टी बायोटीक व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा प्रकार समोर आला. सध्या अॅन्टी बायोटीक औषधांची गरज असताना रुग्णांना ते वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागते.