बुलडाणा: बोरगाव वसू येथे वीज पडून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:34 AM2018-04-09T01:34:21+5:302018-04-09T01:34:21+5:30
चिखली: बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून, रविवारी चिखली तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, रविवारी चिखली तालुक्यातील पावसादरम्यान वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना बोरगाव वसू येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून, रविवारी चिखली तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, रविवारी चिखली तालुक्यातील पावसादरम्यान वीज पडून एक जण ठार झाल्याची घटना बोरगाव वसू येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
रामेश्वर प्रल्हाद सपकाळ (४५) असे वीज पडून ठार झालेल्या शेतक-याचे नाव आहे. बोरगाव वसू परिसरात असलेल्या शेतातून ते आपले काम आटोपून घरी येत होते. गावानजीक बसस्थानकाजवळ ते पोहोचले असता परिसरात सोसाट्याचा वारा सुटून आभाळ भरून आले. या दरम्यान, विजांचा कडकडाट झाला आणि वीज रामेश्वर प्रल्हाद सपकाळ यांच्या अंगावर पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून घाटावरील काही भागात वादळी वाºयासह पाऊस होत असून, बुलडाणा शहर व चिखली तालुक्यातील काही भागात रविवारी पाऊस झाला.
या पावसामुळे अनेक भागात झाडे पडली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, तर काही परिसरातील आंब्याचे नुकसान झाले आहे; मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली. बुलडाणा तालुक्यातील काही परिसरात पाऊस तर काही परिसरात चटके देणारे ऊन असल्याचे दिसून आले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी अनेक ठिकाणी उकाडा कायम होता.
बुलडाण्यात पाऊस
बुलडाणा: शहरात रविवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. काही भागात हलकासा पाऊस झाला, तर सुंदरखेड परिसरात १० मिनिटे चांगला पाऊस पडला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. शनिवारी सिंदखेड राजा तालुका व लोणार तालुक्यातील काही भागात पाऊस झाला होता, तर सिंदखेड राजा तालुक्यात काही ठिकाणी झाडे तुटली होती. रविवारी बुलडाण्यात बाजारचा दिवस असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच बुलडाण्यात तापमानाचा चटका जाणवू लागला होता. एप्रिलमध्ये तर शहरातील तापमान ३९ अंशापर्यंत पोहोचले. वातावरणातील उष्णता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हापासून बचाव झाला. दरम्यान रविवारी दुपारी ढगांचा गडगडाट व वाºयासह पाऊस पडला.