नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By संदीप वानखेडे | Published: August 7, 2022 12:00 AM2022-08-07T00:00:48+5:302022-08-07T00:01:42+5:30
सवडद येथील घटना; साेयाबीन, कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव
संदीप वानखडे/ साखरखेर्डा (बुलडाणा): निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षीपासून नुकसान हाेत आहे, त्यातच कपाशी आणि साेयाबीन पडलेल्या अळ्यांवर नियंत्रण येत नसल्याचे हतबल झालेल्या ४० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सवडद येथे ६ ऑगस्ट राेजी सायंकाळी ७ वाजता घडली. मुरलीधर नरसिंहराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सवडद येथील मुरलीधर देशमुख यांच्याकडे १० एकर शेती आहे, त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली आहे. वातावरणात दमटपणा वाढवल्यामुळे सध्या सोयाबीन व कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून फवारणी करूनही सोयाबीनवरील अळी आटोक्यात येत नसल्याने ते हतबल झाले हाेते. आधीच सततच्या पावसामुळे तण वाढले आहे, मागील वर्षीही शेती खरडून गेली होती, त्याचाही मोबदला मिळाला नाही. पीक विम्याचे पैसेही मिळत नाही. या विवंचनेत मुरलीधर देशमुख हाेते. अखेर त्यांनी शनिवारी सायंकाळी शेतातून घरी परत आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.