हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव; नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:38 PM2020-10-27T12:38:31+5:302020-10-27T12:39:07+5:30
हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची ओरड आजपर्यंत होती; मात्र जिल्ह्यात यावर्षी उलट चित्र आहे. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरवली आहे. नोंदणी करूनही मूग, उडीदाची खरेदी आजही शुन्यावर आहे. तर सोयाबीनचीही केवळ नोंदणीच झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शासनाकडून शेतमालाचे हमीभाव ठरवून दिले जातात. परंतू नाफेड केंद्राकडे या हमीभावात शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी कसरत करावी लागते. हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची खरेदी केल्या जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना नेहमी बसतो. परंतू यंदा याउलट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना नाफेड केंद्रापेक्षा खासगी व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करणे परवडत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राकडे सध्या शेतकरी फिरकतही नाहीत.
पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद घरतही आले नाही. हमीभाव कमी असल्याने शेतकरी नाफेडकडे येण्यास तयार नाही. हमीभाव वाढवणे आवश्यक आहे. -भागवत देशमुख, शेतकरी
हमीभावा पेक्षा व्यापाऱ्यांकडे जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांकडे माल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी नाफेड केंद्र आहेत. नोंदणी केलेल्यांना अद्याप माल आणला नाही.
-नंदकुमार खडके, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्र संघ, बुलडाणा.