Buldhana: ठेवीदारांची ६ काेटींनी फसवणूक, उन्नती महिला पतसंस्थेच्या संचालकांसह लेखापालावर गुन्हे
By सदानंद सिरसाट | Published: July 13, 2023 03:38 PM2023-07-13T15:38:05+5:302023-07-13T15:38:41+5:30
Buldhana: उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर संस्थेमध्ये ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुद्ध गुरुवारी दुपारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
- सदानंद सिरसाट
बुलढाणा - उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर संस्थेमध्ये ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुद्ध गुरुवारी दुपारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, न्यायालयीन आदेशानंतरही ही कारवाई झाली आहे.
उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ८१ लाख २४ हजार रुपयांच्या जमा असलेल्या ठेवी परत न केल्याने याबाबतची वैयक्तिक तक्रार मलकापूर तालुक्यातील कुलमखेड येथील वैभव गणेशराव पाटील (३२) यांनी केली. त्यानुसार मलकापूर शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, सहकलम १४६ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये आरोपी पतसंस्था अध्यक्षा अंजली सुमंतराव पंत, रा. मलकापूर, लेखापाल रमेश प्रल्हाद तांदुळे यांच्यासह संचालकांनी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ठेवीदारांची ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी फसवणूक केल्याचे नमूद आहे. सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वसंत प्रभाकर राठोड यांच्याकडून अंकेक्षण करण्यात आले. त्यांच्या लेखापरीक्षण अहवालानुसारही तक्रार करण्यात आली. त्यानुसार भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४७०, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी मलकापूर शहरातील रहिवासी अंजली सुगतराव पंत, उषा दामोदरदास लखानी, अपर्णा दिलीपराव देशपांडे, प्रभावती मधुकर भलभले, ज्योती गजानन पंत, मनीषा विवेक बापट, नरसीम बेगम नासीर खान, सुनीता अनंत चव्हाण, वैशाली संतोषगीर गिरी, रूपाली सुरेश वैद्य, शर्मिष्ठा राजेश यावलकार, व्यवस्थापक राजेश वसंत चव्हाण, सुनीता गजानन जाधव, रमेश प्रल्हाद तांदुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
- न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा
पतसंस्थेच्या महिला अध्यक्ष, संचालकांनी गैरकायदेशीरपणे कर्ज वाटप केले. त्यापैकी ८१ लाख २४ हजार रुपये परत न केल्याने वैभव पाटील यांनी कलम १५६ (३) नुसार प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्यावर न्यायालयाने ८ जून रोजी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाने पतसंस्थेच्या अध्यक्षा, संचालक, लेखापाल, व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात आले.