Buldhana: गांगलगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षणांचा खेळखंडोबा! विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 19, 2023 07:15 PM2023-08-19T19:15:49+5:302023-08-19T19:16:18+5:30
Buldhana: चिखली तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा व पीएमश्री योजनेतील शाळेच्या माध्यमातून जि.प.शाळांना उभारी देण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या हेतूला नख लावण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याचा प्रकार गांगलगाव जि.प.शाळेत उघडकीस आला.
- ब्रह्मानंद जाधव
चिखली - तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा व पीएमश्री योजनेतील शाळेच्या माध्यमातून जि.प.शाळांना उभारी देण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या हेतूला नख लावण्याचे काम शिक्षकांकडून होत असल्याचा प्रकार गांगलगाव जि.प.शाळेत उघडकीस आला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थीनीला शाळेसह वर्गशिक्षकाचे देखील नाव येत नसल्याचा प्रकार समोर आल्याने शिक्षणांचा खेळखंडोबा दिसून येत आहे.
तालुक्यातील गांगलगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग व एकूण पटसंख्या ८४ आहे. तर या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाच शिक्षक आहेत. मात्र, पाच शिक्षकांपैकी दोन शिक्षक हे दांडीबहाद्दर आहेत. शनिवार सकाळच्या शाळेची वेळ सव्वा सात असतानाही ८ वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत पोहचलेले नव्हते. शिवाय शाळेचे गेटही उघडल्या गेलेले नव्हते. ही बाब पालकांना समजल्यानंतर पालकांनी शाळेत दाखल होत गटशिक्षणाधिकारी समाधान खेडेकर यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. याची तातडीने दखल घेत खेडेकर साडेआठच्या सुमारास शाळेला दाखल झाले. उशीराने शाळेत दाखल झालेल्या शिक्षकांची खरडपट्टी काढत पालकांना शाळेच्या प्रगतीकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शिक्षकांनाही शाळा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे.
शिक्षकांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक
शाळेवर गजानन म्हस्के, अनिल साळवे, प्रकाश पडघान, ज्ञानेश्वर खंडागळे, देवकुमार टेकाडे या पाच शिक्षकांच्या नियुक्त्या आहेत. यातील गजानन म्हस्के यांनी या महिन्यात दोन दिवस कर्तव्य बजावल्यानंतर ३ ते ५ पर्यंत किरकोळ रजा व ७ तारखेपासून आजारी रजेवर आहेत. प्रकाश पडघान यांनी याच महिन्यात ८, ९ व ११ रोजी किरकोळ रजा आणि त्या पश्चात १७ तारखेपासून विना परवानगी रजेवर आहेत. शनिवारी तीन शिक्षक उपस्थित होते. त्यापैकी एक शिक्षक मिटींग संपवून १० वाजता शाळेत पोहचले, एक शिक्षक ८.२० वाजता शाळेत दाखल झाले. शिक्षकांचा या दांडीबहाद्दरपणा व लेटलतीफपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कपाटात दारूच्या रिकाम्या शिशा
शाळेतील कपाटात दारूच्या रिकाम्या शिशा, ग्लास आदी आढळून आले आहे. काही वर्गखोल्यांना पावसामुळे गळती लागलेली असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे.
पालक आक्रमक
या शाळेत शिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा पाहता गटशिक्षणाधिकारी खेडेकर यांनी शिक्षकांना तंबी देत पालकांना आश्वस्त केले असले, तरी शाळेची प्रगती न झाल्यास शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडे तक्रार करण्यासह शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.