बुलढाणा : चारचाकी, दुचाकीची जोरदार टक्कर, अपघातातील गंभीर जखमीचा मृत्यू
By विवेक चांदुरकर | Updated: April 3, 2024 16:37 IST2024-04-03T16:37:20+5:302024-04-03T16:37:40+5:30
राष्ट्रीय महामार्गावर धानोरा फ्लायओव्हरजवळ चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.

बुलढाणा : चारचाकी, दुचाकीची जोरदार टक्कर, अपघातातील गंभीर जखमीचा मृत्यू
मलकापूर: राष्ट्रीय महामार्गावर धानोरा फ्लायओव्हरजवळ चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या तरुणाचा बुलढाणा येथे उपचारादरम्यान मंगळवारी उशिरा रात्री मृत्यू झाला.
नांदुरा तालुक्यातील गोसींग येथील रहिवासी संजय दुर्योधन हाडे (वय ३५) त्याचा गावातीलच सहकारी मंगेश शांताराम सुरडकर (वय ३३) याच्या समवेत एम.एच.२८ ए.एफ.२४९५ क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतीच्या वाटेवर निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर धानोरा फ्लायओव्हरजवळ मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास विरूद्ध दिशेने भरघाव आलेल्या चारचाकी क्र.जी.जे.१५/सी.जे.६६७२ व दुचाकीमध्ये धडक होऊन अपघात घडला. या घटनेत संजय दुर्योधन हाडे हा जागीच ठार झाला.
त्याचा सहकारी मंगेश शांताराम सुरडकर हा गंभीर जखमी झाला. त्याला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तत्काळ बुलढाणा हलविण्यात आले. त्याचा उशिरा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.