बुलडाणा जिल्ह्यात परदेश वारीची वाढली क्रेझ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:55 AM2018-03-16T00:55:24+5:302018-03-16T00:55:24+5:30
बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे. मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे.
सोहम घाडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे. मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे.
परदेशाबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. तिथली संस्कृती, विकास, सोयी-सुविधा, आधुनिक साधने, नैसर्गिक सौंदर्य याबाबत कुतूहल असते. चित्रपट, पुस्तके व इंटरनेटसारख्या जलद माध्यमांमधून दुस-या देशांविषयीची माहिती मिळत असते. सहाजिकच तिथल्या चांगल्या गोष्टींची, वेगळेपणाची भुरळ पडते. कधीतरी परदेशाला भेट द्यावी, अशी इच्छा निर्माण होते. टुरिस्ट कंपनीच्या सवलतीमधील सहलींमुळे अनेकांचे परदेश वारीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अर्थात, सर्वांनाच परदेश वारी शक्य होतेच असे नाही. आर्थिक परिस्थिती चांगली असणारे सोयीप्रमाणे परदेश भ्रमंती करतात. परदेशात जाणारे अथवा जाण्यास इच्छुक असणा-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०१५ पासून आतापर्यंत जवळपास १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्टसाठी नोंदणी केली. साधारपणे साडेचार हजार नागरिक दरवर्षी पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. त्याशिवाय परदेशात जाता येत नाही. तसे केल्यास तो गुन्हा मानला जातो. पासपोर्ट हे परदेशात जाण्यासाठीचे ओळखपत्र असते. त्यासाठी नजीकच्या विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित क्षेत्रीय पारपत्र कार्यालयातून कागदपत्रे, इतर तपासणी व पोलीस व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट मिळतो. जिल्ह्यात सध्या परदेशी प्रवासाची क्रेझ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
पासपोर्टचे प्रकार
पासपोर्ट तीन प्रकारचे असून, त्याचे रंग वेगवेगळे असतात. राजनैतिक पासपोर्ट लालसर रंगाचा असतो. सरकारी पासपोर्ट पांढरा तर सामान्य पासपोर्ट हा सामान्य नागरिकांसाठी असून, त्याचा रंग निळसर असतो. दीड हजार रुपये शासकीय शुल्क भरून आपल्याला पासपोर्ट काढता येतो. आता टॅब प्रणालीमुळे पासपोर्ट काढण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे.
परदेश वारीचा टक्का वाढला!
पर्यटन, शिक्षण, नोकरी, नातेवाइकांच्या भेटी व इतर कामाच्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
गत तीन वर्षांत पासपोर्टसाठी दाखल अर्जावरून याचा अंदाज येतो. २०१५ मध्ये ४ हजार १००, २०१६ मध्ये ३ हजार ८८२, २०१७ मध्ये ४ हजार ३४८ तर चालू वर्षात १३ मार्चपर्यंत १ हजार १३३ नागरिकांनी पासपोर्ट काढण्यासाठी येथील विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल केले.