बुलढाण्याच्या प्रश्नांवर विधानसभेत रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:05 PM2019-06-28T14:05:22+5:302019-06-28T14:05:32+5:30

बुलडाणा: इंग्रजकालीन वसलेल्या टुमदार बुलडाणा शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेविरूध्द गुरूवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे रणकंदन झाले.

Buldhana issues raise in Legislative Assembly | बुलढाण्याच्या प्रश्नांवर विधानसभेत रणकंदन

बुलढाण्याच्या प्रश्नांवर विधानसभेत रणकंदन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: इंग्रजकालीन वसलेल्या टुमदार बुलडाणा शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेविरूध्द गुरूवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे रणकंदन झाले.
दरम्यान ठोस भुमिकेचा आग्रह धरणाऱ्या आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्ष नेत्यांसह उपस्थित सदस्यांनी चढविलेला हल्ला लक्षात घेता बुलडाणा शहराच्या प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात नगर विकास विभागाचे राज्य मंत्री, विरोधी पक्ष नेते, आ. हर्षवर्धन सपकाळ व नगर विकास विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक रात्री उशिरा घेण्यात आली.
बुलडाणा शहरातील अस्वच्छता, दूषित पाणी पुरवठ्यामुळे नगरिकांचे धोक्यात आलेले आरोग्य, अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाढलेले अपघात व मणक्यांचे आजार, बंद पडलेले पथदिवे, दलीत वस्ती सुधार योजनेतील अपहार, एलईडी लाईट घोटाळा, रखडलेले नाट्यगृह इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून गुरूवारी कामकाजाच्या पहिल्याच तासात नगर विकास राज्यमंत्र्यांना धारेवर धरले. सभागृहास वितरीत करण्यात आलेले लेखी उत्तर हे गुळगुळीत व पारंपारिक प्रशासकीय धाटणीतील असल्याचा आरोप करून जनहितासाठी शासन ठोस भुमिका घेणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या चर्चेत नगर विकास राज्यमंत्री वस्तुस्थितीला बगल देत होते. शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नगर परिषदेच्या गलथानपणाबद्दल दोषी अधिकाºयावर कारवाई व गंभीर तक्रारींच्या अनुषंगाने सर्वंकष चौकशीची मागणी आ. सपकाळ यांनी रेटून धरली होती. त्यामुळे सभागृहात कोंडी निर्माण झाली व अखेरीस अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. मात्र शहराच्या समस्यां व विकास निधीच्या मागणीबाबत सरकार गंभीर नसल्याने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सभागृहातील वेलमध्ये बैठा सत्याग्रह सुरू केला. त्यांच्या या सत्याग्रहाला समर्थन देत आ. विरेंद्र जगताप, आ. राहुल बोंद्रे, आ. यशोमती ठाकूर यांनी सुध्दा ठिय्या दिला. यावेळी पालिकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान आदिवासी मंत्री प्रा. अशोक उईके, नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर आ. हर्षवर्धन सपकाळ यांची समजूत काढली.
दरम्यान सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जेष्ठ नेते अजितदादा पवार, जयंतराव पाटील यांनी सुध्दा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहराबाबत सभागृहात अनेकदा प्रश्न उपस्थित करून देखील शासन उदासिन असल्याचे सांगून ठोस भुमिका जाहीर करण्याबाबत मागणी केली.
अखेरीस सभागृहातील सर्व विरोधी पक्ष सदस्यांचा वाढता पाठींबा लक्षात घेता विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज संपण्याच्या आत उपाध्यक्षांच्या दालनात या मुद्द्यांवर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. ही बैठक मग नंतर रात्री उशिरा घेण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बुलडाणा शहरातील ज्वलंत समस्यांसंदर्भात या बैठकीत नेमके काय निर्णय झाले याबात सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Buldhana issues raise in Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.