Buldhana: विठूरायाच्या दर्शनाला जाऊ चला; पंढरपूरसाठी बुलढाणा जिल्ह्यातून २२० बसेस
By दिनेश पठाडे | Published: July 7, 2024 06:32 PM2024-07-07T18:32:58+5:302024-07-07T18:33:18+5:30
Buldhana News: आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील शेकडो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील सात आगारांतून २२० बसेस सोडल्या जाणार आहेत.
- दिनेश पठाडे
बुलढाणा - आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील शेकडो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील सात आगारांतून २२० बसेस सोडल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात बुलढाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव अशी सात आगार आहेत. पंढरपूरसाठी या सातही आगारांतील अनेक बसेस पंढरपूर यात्रेसाठी राखीव ठेवून विशेष बसेस म्हणून धावणार आहेत. यात्रा वाहतुकीवर संबंधित आगार व्यवस्थापक लक्ष ठेवून असणार आहेत. विविध कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. यंदा महामंडळाने थेट गावातूनच बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आगार व्यवस्थापकांनी आगार कक्षेत येणाऱ्या कोणत्याही गावांमध्ये कमीत कमी ४० प्रवासी थेट मिळत असल्यास त्या प्रवाशांकडून प्रवास भाड्याची पूर्ण रक्कम आगाऊ भरणा करून घेत संबंधित गावातून थेट पंढरपूरकरिता यात्रा बस देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विभागीय नियंत्रकांनी दिल्या आहेत. दरम्यान, आगारनिहाय करण्यात आलेले नियोजन प्रवासी प्रतिसाद कसा राहील, यावर अवलंबून राहणार आहे. राज्य शासनाने लागू केल्यानुसार त्या-त्या सवलतीत भाविकांना विशेष बसमध्येदेखील तिकीटदरात सूट मिळणार आहे. त्यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत, ६५ ते ७० वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के सवलत तसेच इतर सवलतधारकांनादेखील सवतलीनुसार प्रवास करता येणार आहे.
असे आहे आगारनिहाय नियोजन
बुलढाणा - ४३
चिखली - २८
खामगाव - ४०
मेहकर - ३८
मलकापूर - २९
जळगाव जामोद - २८
शेगाव - १४
१३ ते २१ जुलैदरम्यान धावणार विशेष बसेस
बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगारांतून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडल्या जाणार आहेत. ह्या विशेष बसेस १३ ते २३ जुलै या कालावधीमध्ये धावतील. यात्रेचा मुख्य दिवस आषाढी एकादशी १७ जुलै हा राहणार आहे.