बुलडाणा जिल्ह्यातील नगरपालिकांची शौचालय बांधकामात दमदार कामगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:07 AM2018-02-25T00:07:55+5:302018-02-25T00:07:55+5:30
खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार पालिकांनी बाजी मारली आहे.
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार पालिकांनी बाजी मारली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहरांची संकल्पना हाती घेण्यात आली. त्यानुषंगाने शहरातील उघड्यावरील हगणदारी आणि शौचालय नसलेल्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पृष्ठभूमीवर पालिकेतर्फे शहरात शौचालय सर्वेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली. त्यानुसार वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये फेर सर्वेक्षण करून उद्दिष्ट ठरविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरे हगणदरीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी भर दिल्या जात आहे. यामध्ये शौचालय बांधकामाला म्हणजेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती देण्यासाठी लाभार्थीला प्रत्येकी केंद्र, राज्य आणि स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने १६ हजार रुपयांचे (काही ठिकाणी १२ हजार रुपये) अनुदानही दिल्या जाते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींना कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत शेगाव पालिका सुरुवातीपसूनच प्रगतिपथावर असून, जळगाव जामोद, नांदुरा, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा पालिकेने दमदार कामगिरी केली असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.
मोताळा नगर पंचायतीचाही वेगळा ठसा!
नव्यानेच नगर पंचायतीचा दर्जा मिळालेल्या मोताळा नगर पंचायतीनेही शौचालय बांधकामात वेगळा ठसा उमटविला आहे. मोताळा नगर पंचायतीत ४,४00 एकूण घरांची संख्या आहे. यापैकी ५६0 घरांमध्ये शौचालय नसल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नोंदविण्यात आले. त्यानुसार येथे ५६0 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या उद्दिष्टापैकी ५२0 शौचालयांची निर्मिती झाली असून, या ठिकाणी ४0 शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
बुलडाणा, चिखली आणि खामगावचीही आगेकूच!
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत बुलडाणा, खामगाव आणि चिखली पालिकेचीही उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांपैकी बहुतांश नगर पालिकांनी उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना ७0 टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी गाठली आहे, तर काही पालिकांची शंभर टक्के वाटचालीकडे आगेकूच असून, यामध्ये मोताळा नगर पंचायतीसह शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिकांचा समोवश आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रित केले. यशस्वी वाटचालीवर शेगाव पालिकेने जिल्ह्यात शिक्कामोर्तब केला आहे. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत पदाधिकार्यांसह शहरातील नागरिकांचे योगदान अनमोल आहे.
- अतुल पंत
मुख्याधिकारी, नगर परिषद, शेगाव.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय निर्मितीत जळगाव जामोद पालिकेने अल्पावधीत आगेकूच केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातही जळगाव जामोद पालिकेची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे समाधान आहे. नागरिक आणि पदाधिकार्यांचे सहकार्य मिळत आहे.
- डॉ. प्रशांत शेळके
मुख्याधिकारी, न.प, जळगाव.