Buldhana: सकल मराठा समाजाच्यावतीने माेताळ्यात रास्ता राेकाे, गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
By संदीप वानखेडे | Published: September 2, 2023 04:55 PM2023-09-02T16:55:01+5:302023-09-02T16:55:36+5:30
Buldhana News: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला.
- संदीप वानखडे
मोताळा - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचा निषेध करीत सकल मराठा समाजाच्या वतीने माेताळा येेथे निषेध करण्यात आला तसेच गृहमंत्री ना़ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सकल मराठा समाजाच्या वतीने २ सप्टेंबर राेजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी मोताळा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षण मिळावे यासाठी शांतता मार्गाने आंदोलन करीत आलेला आहे़ या आधी ही मराठा समाजाने संवैधानिक पद्धतीने लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून आपली मागणी शासनाकडे वेळोवेळी केली आहे, अशाच पद्धतीची मागणी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधव शांततेच्या व संवैधानिक पद्धतीने आंदोलन करीत आहे. या आंदोलनकर्त्यांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुष पद्धतीने लाठी हल्ला व गोळीबार केला़ यामध्ये मराठा समाज बांधव गंभीर जखमी झाले आहे. सकल मराठा समाज शासनाच्या या अमानवी कृतीचा जाहीर निषेध करते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे.