Buldhana: गुजरातमधील वडनगरमधून ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीस अटक
By निलेश जोशी | Published: July 13, 2024 07:15 PM2024-07-13T19:15:37+5:302024-07-13T19:16:00+5:30
Buldhana Crime News: गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर येथून बुलढाणा सायबर पोलिसांनी १० लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एकास आरोपीस अटक केली आहे. दरम्यान कधी काळी झारखंडमधील जामताडा हे गाव सायबर गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते तर आता त्यात वडनगरचीही भर पडत असल्याचे चित्र आहे.
- नीलेश जोशी
बुलढाणा - गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर येथून बुलढाणा सायबर पोलिसांनी १० लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एकास आरोपीस अटक केली आहे. दरम्यान कधी काळी झारखंडमधील जामताडा हे गाव सायबर गुन्ह्यासाठी प्रसिद्ध होते तर आता त्यात वडनगरचीही भर पडत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील रहिवाशी अभिजीत अनिल जाधव (३९) यांची शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाख २० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यात दिली होती.
प्रकरणाच्या तांत्रिक तपासामध्ये पोलिसांना आरोपीचे लोकेशन गुजरातमधील महेसाना जिल्ह्यातील वडनगर दाखवत होते. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रकाश सदगीर पोलीस कर्मचारी शकील खान, रामू मुंडे, राजदीप वानखेडे, क्षीतीज तायडे, विक्की खरात यांचे पथक गुजरातमध्ये गेले. वडनगर येथून त्यांनी आरोपी अनिलजी अर्जुनजी ठाकूर याचा शोध घेत त्यास १३ जुलै रोजी सकाळी बुलढाण्यात आणले. त्याच्यावर बुलढाणा, वडनगर तसेच हैदराबाद येथे देखील सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. दरम्यान गुजरातमधील वडनगर येथील रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान असतांना त्यांना वडिलांना चहा विकण्यास मदत केली होती. त्याच वडनगरमधून पोलिसांनी ऑनलाईन फसवणुकीतील आरोपीस ताब्यात घेतले आहे.
एसपींशी चर्चा झाल्यानंतर दिले ताब्यात
सुमारे ८०० किमी लांबीचा प्रवास करत बुलढाण्याचे सायबर पोलिस हे वडनग येथे पोहोचले. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन त्यांनी आरोपीचा शोध लावत त्यास ताब्यात घेत तेथील पोलिस ठाण्यात आणले. मात्र वडनगरच्या ठाणेदाराने आरोपीला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. आम्ही आमच्याकडील गुन्ह्यात त्यास अटक करत असल्याचे कारण त्यासाठी दिले. त्यामुळे आरोपीचा शोध लावल्यानंतरही रिकाम्या हाताने कसे जायचे, असाप्रश्न सायबर पोलिसांसमोर होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांना याची माहिती दिली. त्यांनी महेसानाचे पोलिस अधीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आरोपीस बुलढाणा सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.