Buldhana: लेखिका ताराबाई शिंदे यांच्या स्मारकासाठी सरसावल्या संघटना
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 19, 2023 04:47 PM2023-06-19T16:47:19+5:302023-06-19T16:47:28+5:30
Buldhana News: आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचे बुलढाणा येथे स्मारक व्हावे, या मागणीसाठी बुलढाणेकर पुढे सरसावले आहेत.
- ब्रह्मानंद जाधव
बुलढाणा - आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचे बुलढाणा येथे स्मारक व्हावे, या मागणीसाठी बुलढाणेकर पुढे सरसावले आहेत. लेखक, कवी, विचारवंत, पत्रकार व विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी १९ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवित शासन दरबारी हा विषय पोहचविणार असल्याचे सांगितले.
आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचा जन्म बुलढाण्यातला. बुलढाण्यातच त्यांची प्रतिभा फुलली व त्यांच्या लेखणीला बहर आला. जगाने दखल घ्यावा, असा ग्रंथ ताराबाई शिंदेंनी लिहिला. त्यांचा स्त्री -पुरुष तुलना हा ग्रंथ समस्त महिला वर्गाची कैफियत आहे. जगामधील मोजक्या स्त्रीवादी लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचा समावेश होतो. बुलढाणा येथील कारंजा चौकात त्या लहानच्या मोठ्या झाल्या. या ठिकाणी त्यांचा वाडादेखील होता. मात्र तो आज नाही. ताराबाईंना अभिवादन करण्यासाठी साहित्यिक, लेखक, ग्रंथप्रेमी, विचारवंत, महिलावर्ग, मंडळींना आज अभिवादनासाठी जागा नाही. साहित्य संमेलनाची दिंडी अभिवादनासाठी घेऊन जावी, अशी एखादी जागा शहरात असावी, अशी समस्त बुलढाणेकरांची इच्छा आहे.
सध्या बुलढाण्यामध्ये अनेक ठिकाणी पुतळे बसवले जात आहेत. त्यात एखादा पुतळा ताराबाई शिंदे यांचा बसविल्यास अभिवादन करण्यासाठी सोपे जाईल. शिवाय अनेक लेखकांची जशी स्मारके झाली आहेत, तसेच जगप्रसिद्ध ताराबाई शिंदे यांचे असावे, यासाठी लेखक, कवी, पत्रकार, विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, प्राचार्या शाहिना पठाण, गणेश निकम, बावन बुरजी कृती समितीचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील, अरविंद बापू देशमुख, साहित्यिक सुरेश साबळे, मराठा सेवा संघाचे डॉ. मनोहर तुपकर, साहित्यिक बरोमासकार सदानंद देशमुख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ताराबाई जागतिक किर्तीच्या लेखिका- शाहिना पठाण
ताराबाई शिंदे या केवळ बुलढाण्यापुरते मर्यादित व्यक्तिमत्व नाही तर, त्यांच्या ग्रंथाची दखल जागतिक स्तरावर घेतल्या जाते. बुलढाणा त्यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या किर्तीला साजेशे त्यांच्या स्मारकासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे मत शाहिना पठाण यांनी यावेळी व्यक्त केले.