बुलढाणा : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त खामगावात शोभायात्रा
By अनिल गवई | Published: April 4, 2023 01:54 PM2023-04-04T13:54:03+5:302023-04-04T13:54:22+5:30
सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
खामगाव: जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर या शोभायात्रेचा देवजी खिमजी मंगल कार्यालयात समारोप करण्यात आला.
स्थानिक सकल जैन समाजाच्यावतीने आयोजित शोभायात्रेत मातृशक्तीचा मोठ्यासंख्येने सहभाग होता. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची आकर्षक मूर्ती असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सराफा येथील जैन मंदिरातून सुरू झालेली शोभायात्रा फरशी, मेनरोड, महावीर चौक, अकोला बाजार, गांधी चौक, अग्रेसन चौक मार्गे देवजी खिमजी मंगल कार्यालयात पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
शोभायात्रेतील सहभागींचे स्वागत
सकल जैन समाज तसेच शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने महावीर जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महावीर चौकात कुल्पीचे वितरण करण्यात आले. अकोला बाजारात थंड पेय, चहा, शरबताचे वितरण करून शोभायात्रेचे स्वागत झाले. अग्रसेन चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शोभायात्रेचे स्वागत झाले.