Buldhana: समृद्धीवर रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्याचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा प्रस्ताव
By निलेश जोशी | Published: July 4, 2023 01:23 PM2023-07-04T13:23:21+5:302023-07-04T13:24:54+5:30
Samriddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रिफ्रेशमेंट सेंटर तसेच वे साईड ॲमिनीजीट सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे.
- नीलेश जोशी
बुलढाणा - भविष्यातील अैाद्योगिक विकासासह विदर्भातील अर्थकारण केंद्रीभूत होणाऱ्या समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी रिफ्रेशमेंट सेंटर किंवा वे साईड ॲमिनीटीजच उपलब्ध नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ रस्ते संमोहन हाऊन मानवी चूक किंवा वाहनातील तांत्रिक दोषामुळे या मार्गावर अपघात होत आहेत. परिणामस्वरुप या मार्गावर रिफ्रेशमेंट सेंटर तसेच वे साईड ॲमिनीजीट सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे.महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनीच अनुषंगीक प्रस्ताव दिला असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केेल आहे.
समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात पिंपळखुटा गावानजीक खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन त्यात २५ जणांचा जळाल्याने मृत्यू झाल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावर रिफ्रेशमेंट सेंटरचा असलेला अभाव पहाता हा प्रस्ताव देण्यात आला आहे. या अपघातानंतर महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या सदस्य असलेल्या पतसंस्थांकडून अनुषंगीक प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यानुषंगाने जागा उपलब्ध करून दिल्यास आगामी दोन महिन्यात हे रिफ्रेशमेंट सेंटर किंवा वे साईड ॲमिनीटीज सुरू करता येतील असे राधेश्याम चांडक यांचे म्हणणे आहे.
रस्ते संमोहन टाळता येईल
समृद्धीवर सध्या अशा सुविधा नाही. या मार्गावर किमान १०० किमी अंतरावर अशी सुविधा उपलब्ध झाल्यास वाहन चालकांना भेडसावणारी रस्ते संमोहनाची समस्या दुर होण्यास मदत होईल. सोबतच अशा ठिकाणीच वाहन चालकांसह प्रवाशां आपतकालीन स्थितीत वाहनाचील संकटकाली मार्ग कसा उघडायचा वाहनात तशा सुविधा आहेत का? याचेही या ठिकाणी प्रात्याक्षीक दाखवून त्यांचे समुपदेशनही करता येऊ शकते.
समृद्धी विदर्भाची जीवन वाहिनी
समृद्धी महामार्ग विदर्भाची जीवन वाहीनी आहे. महामार्गाशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट आहे. या रस्त्याभोवतीच येत्या काळातील विकास शक्य आहे. त्यादृष्टीनेच फडणवीसांनी रस्त्याची आखणी केली होती. गॅस पाईपलाईन, बुलेट ट्रेन हेही या रस्त्यालगतचे आगामी मोठे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे अपघाताच्या मुद्द्यांवर कारणमिमांसा करून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे राधेश्याम चांडक म्हणाले. दरम्यान समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी वे साईड ॲमिनीटीज सुरू करण्यात येणार होत्या. त्याही हा महामार्ग सुरू होऊन साडेसहा महिने झाले तरी सुरू झालेल्या नाहीत. प्रसंगी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकते.
राज्यातील दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावाजवळून हा रस्ता जातो. या महामार्गावर येणाऱ्या जिल्ह्यातील पतसंस्थांना नाममात्र दरात जागा उपलब्ध केल्यास अवघ्या दोन महिन्यात येथे रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करू. यासोबतच सहकार ही बळकट होण्यास मदत होऊन प्रवाशांनाही चांगल्या सुविधा मिळतील.
- राधेश्याम चांडक, संचालक महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन