बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस, वीज पडून शेतकरी ठार
By admin | Published: November 14, 2014 11:22 PM2014-11-14T23:22:41+5:302014-11-14T23:22:41+5:30
बुलडाणा शहरात सायंकाळी अर्धा तास पाऊस, पिकांचे नुकसान.
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील जयपूर येथील एका शेतकर्याच्या अंगावर विज पडून ठार झल्याची घटना घडली. जयपूर येथील शेतकरी सिद्धार्थ प्रल्हाद डोंगरे (३२) हे गावा शेजारील आपल्या शेतामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे ज्वारीचे कणसे झाकत होते. दरम्यान त्यांच्या अंगावर अचानक वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्ह्यात वादळी वार्यासह आज काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुलडाणा तालुक्यासह मेहकर, खामगाव, चिखली तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील पीक व मालाचे नुकसान झाले. बुलडाणा शहरात सायंकाळी अर्धा तास पाऊस झाला. मोताळा तालुक्यात जयपूर, कोथळी, आडविहिरी, तिघ्रा, वरूड, मोताळा, शिरवा, बोराखेडी, परडा आदी गावांमध्ये दुपारी ३ वाजता वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, परिसरातील अनेक गावांमध्ये या पावसाने रब्बी पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.