संत सोनाजी महाराजांची यात्रा रद्द: भाविकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 11:38 AM2020-11-20T11:38:57+5:302020-11-20T11:39:07+5:30
Buldhana District News श्री संत सोनाजी महाराज यांची यात्रा कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रद्द करण्यात आली आहे.
- अझहर अली
संग्रामपूर:- शेकडो वर्षांपासून सुरू असलेली संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यांची यात्रा कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा स्वागत अनेक स्तरावरून करण्यात आले, तर काही भक्तांमध्ये नाराजीही दिसून आली आहे.
राज्य शासनाने पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे नियमाचे पालन करीत उघडण्याचे आदेश दिले. सर्वत्र मंदिरे खुली करण्यात आल्याने भक्त गणांमध्ये उत्साह होता. मात्र यात्रा विश्वस्त मंडळाकडून ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत सोनाळा येथील संतनगरीत कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम साजरे होणार नसल्याचे एका पत्रकातून स्पष्ट करण्यात आले. या कालावधीमध्ये येथे पालखी सोहळा, रथोत्सव, काला व महाप्रसादाचे कार्यक्रम शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आयोजित होते. वैश्विक महामारीचा वाढता प्रभाव पाहता यात्रा विश्वस्त मंडळाने सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केल्याने पुरातन काळापासून सुरू असलेली परंपरा खंडित झाली आहे. तसेच संतनगरीत येणाऱ्या भाविकांना यादरम्यान गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री संत सोनाजी महाराज यांच्या यात्रेत विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, तसेच मध्य प्रदेशातील परप्रांतीय भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक असलेली ही यात्रा रद्द झाल्याने सर्वधर्मियांचा हिरमोड झाला आहे. १७ रोजी सोनाळा येथील पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार विजय चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी डि. बी. तडवी, सोनाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार अमर चोरे व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा सदस्यांच्या उपस्थित बैठक पार पडली होती. या बैठकीतही यात्रेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान शांतता समिती बैठक न बोलावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विविध साहित्यांच्या दुकानांवर प्रतिबंध
संत नगरी सोनाळा येथे दरवर्षी चिखली तालुक्यातील उत्रदा पेठ, नांदुरा तालुक्यातील निरपूर, संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद, वडगाव वान, टूनकी बु., बावनबीर, टूनकी खुर्द, आदिवासी ग्राम पिंगळी या ठिकाणावरून पालख्या येत असतात. यात्रेत विविध मनोरंजनाचे खेळ, विविध साहित्यांची दुकाने, खेळणे, पाळणे, चित्रपटगृहे यासह खाद्यपदार्थांचे दुकाने सजतात. मात्र यावर्षी त्यावरही प्रतिबंध लावण्यात आले. यात्रा रद्द करण्यात आल्याने श्रद्धाळूंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
महाप्रसाद वितरणाची परंपरा खंडित
महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांचा सोनाळा येथे अलोट जनसागर दिसून येतो. गेल्या शेकडो वर्षापासून १३१ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, उडीदाची डाळ व अंबाडीच्या भाजीचा महाप्रसाद दहीहांडी फुटल्यावर वितरित करण्यात येतो. मात्र, यावर्षी महाप्रसादाचेही वाटप करण्यात येणार नाही. त्यामुळे शेकडो वर्षापासून सुरू असलेली महाप्रसादाची परंपराही खंडित झाली आहे.