बुलडाणा : सुबोध सावजींचा विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू; पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 08:10 PM2018-01-18T20:10:13+5:302018-01-18T20:17:13+5:30
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १८ जानेवारीपासून विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी-बोरी नळयोजनेच्या विहीरीत दुपारी चार वाजता बसून हे आंदोलन सुरू केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गत हे विहीरीत बसून उपोषण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. एका एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रकरणी कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहीरीत बसून हे उपोषण सुरू केले आहे.
१८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ७३ वर्षीय माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे विहीरीत बैलगाडीच्या पाळण्याद्वारे उतरले व त्यांच्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. बोरी गावच्या चारही विहीरी पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजनेवर एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च झाला आहे. पण गावाला पाणी नाही. ऐवढेच नाही तर नळयोजनेच्या विहीरींचे दानपत्रही नाही. विहीर आजही शेतकर्याच्या ताब्यात आहे. जिल्ह्यातील या सर्वंकषस्तरावली पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव तथा विभागीय आयुक्तांना भेटून त्याबाबत तक्रारही केली होती. जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून २४० गावांची चौकशी करून आॅटीच करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र जिल्ह्यातील अधिकार्यांनी आजपर्यंत कोणावरही कारवाई न केल्यामुळे सुबोध सावजी यांनी ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत नळयोजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई होत नाही तोवर आंदोलन चालू ठेवण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विहीरीत बसूनच त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
१९९७ मध्येही आंदोलनामुळे चर्चेत
सुबोध सावजी यांनी १९९७ मध्येही बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मातमळ गावातील विहीरीत बसून आंदोलन केले होते. सुबोध सावजींच्या या आगळ््या वेगळ््या आंदोलनामुळे ते त्यावळी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा २१ वर्षांनी ते याच पद्धतीने आंदोलन करीत आहेत.
खून करण्याचाही इशारा
पाणीपुरवठा योजनांनमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालणार्यांचा खून करण्याचा इशाराही त्यानी गेल्या वर्षी दिला होता. त्यासंदर्भात सुबोध सावजी यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशीही केली होती.