Buldhana: भारनियमनाविरोधात शिवसेना आक्रमक, महावितरण कार्यालयात धडक लोडशेडिंग थांबवा, अन्यथा...
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 5, 2023 06:01 PM2023-09-05T18:01:44+5:302023-09-05T18:02:14+5:30
Buldhana News: पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली.
- ब्रह्मानंद जाधव
बुलढाणा - पावसाने ओढ दिल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातही महावितरणच्या लोडशेडिंगचा खोडा निर्माण होत आहे. भारनियमन विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक होऊन ५ सप्टेंबर रोजी येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. लोड शेडिंग न थांबविल्यास महावितरणाने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिला.
शिवसेनेने महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना ५ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन भारनियमन बंदची मागणीही केली. बुलढाणा जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली पावसाने वेगवेगळे स्वरूप यंदा दाखवले. घाटावर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. लोडशेडिंगच्या शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद आहेत. पीक परिस्थिती दुष्काळाची असल्याने आणि त्यात ऑगस्ट पूर्णतः कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये देखील पावसाची शाश्वती कमी-अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतातून पीक जगवण्याचा आटापिटा शेतकरी करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा वाढला आहे. महावितरणकडून लोडशेडिंग सुरू केली आहे. लोडशेडिंग संपल्यानंतरही पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. होल्टेज नसल्याने कृषिपंप चालत नाहीत. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत.
लोडशेडिंगची वेळ जाहीर करून त्यानंतर किमान पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा शेतकऱ्यांना व्हावा, महानगरांमध्ये होल्डिंगवर लावण्यासाठी वीजपुरवठा होतो; परंतु शेतकऱ्यांना मात्र पूर्ण क्षमतेने वीज मिळत नाही. त्यांना आणखी अडचणीत आणल्या जाते, असे अनेक प्रश्न शिवसेनेच्या वतीने येथील महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्यासमोर उपस्थित करण्यात आले. महावितरणाने आपला कारभार सुधारून पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने वीज द्यावी नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह प्रा. सदानंद माळी, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अशोक इंगळे, सुधाकर आघाव, डॉ. नंदिनी रिंढे, वर्षा सोनुने, गजानन उबरहंडे, अशोक गव्हाणे, विजय इतवारे, एकनाथ कोरडे, मोहन निमरोट, राहुल जाधव, गजानन चौधरी, बी. टी. म्हस्के, बंटी कपूर, सुधाकर मुंढे, विजय भोसले, मंगेश चव्हाण, किरण दराडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.