बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा कहर!

By admin | Published: May 11, 2017 07:10 AM2017-05-11T07:10:04+5:302017-05-11T07:10:04+5:30

दोघांचा मृत्यू, तर बारा रुग्ण पॉझिटिव्ह : प्रशासन झटकतेय हात!

Buldhana swine flu havoc in the district! | बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा कहर!

बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा कहर!

Next

विवेक चांदूरकर
बुलडाणा : एक महिन्यापासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, दोघांचा मृत्यू, तर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या व्यतिरिक्तही जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे.
जिल्ह्यात एक महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप व सर्दी झालेले काही रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे नमुने पुणे येथे तपासल्यानंतर पाच जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रदीप निनाजी नारखेडे यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच सविता संजय चोपडे, राहुल चव्हाण यासह बारा जणांना या भीषण आजाराची लागण झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचे रुग्ण आहेत. मात्र, त्यांचे नमुने तपासण्यात आले नसून, काही नमुने घेण्यातही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने बाधित रुग्णांचा आकडा समोर येत नाही. जिल्ह्यातील काही रुग्ण हे अकोला व औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना स्वाइन फ्लू झाला असून, त्यांची आकडेवारीही समोर येत नाही.
          स्वाइन फ्लू आहे की नाही, हे तपासण्याकरिता नमुने पुण्याला व्हायसॉलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात येतात. सदर नमुने पाठविण्याकरिता खासगी डॉक्टरांना जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर शासकीय रुग्णालयातून एक किट मिळत असून, या किटमध्येच रुग्णांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक डॉक्टर रुग्णांचे नमुने पाठविण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आणखी काही रुग्णांना स्वाइन फ्लू असला, तरी त्याचे निदान होत नसल्याचे वास्तव आहे.

माझ्या रुग्णालयात काही रुग्ण सर्दी व ताप असल्यामुळे दाखल झाले होते. मी त्यांचे नमुने पुण्याला स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले. यामध्ये पाच रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे पुण्याहून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच नारखेडे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. नागरिकांनी रेल्वे स्थानक, बसस्थानकासारख्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज असून, स्वाइन फ्लू आजार होणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. दीपक लद्धड, बुलडाणा.

Web Title: Buldhana swine flu havoc in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.