बुलढाणा : तहसीलदारांचा चालकच निघाला रेतीमाफियांचा हस्तक
By सदानंद सिरसाट | Published: April 8, 2024 04:44 PM2024-04-08T16:44:01+5:302024-04-08T16:44:45+5:30
दक्षता पथकाला धमकी : जिल्हाधिकाऱ्यांनी केले निलंबित
जलंब (बुलढाणा) : शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांना अभय देण्यासाठी शेगावचे तत्कालीन तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या शासकीय वाहनावर चालक असलेला संतोष भीवसन सातभाकरे याची महत्त्वाची भूमिका असल्याची घटना उघड झाली आहे. सातभाकरे याने गौणखनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी कार्यरत महसूल पथकाला रेतीमाफियांसह धमकी दिल्याचा प्रकार घडला. पथकाच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी चालक सातभाकरे याला निलंबित केल्याचा आदेश दिला.
शेगाव तहसील कार्यालयात वाहन चालक असलेल्या संताेष भीवसन सातभाकरे याच्या रेतीमाफियांशी असलेले संबंध पाहता त्याची सेवा तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे संलग्नित केली आहे. त्याचवेळी शेगाव तालुक्यातील नदीपात्रातील रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पथक स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १८ मार्चला रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान पथक जलंब-माटरगाव रस्त्याने जात होते. यावेळी शेगाव तहसील कार्यालयाचे शासकीय वाहन (एमएच-२८, बीडब्ल्यू-२८९६) यामध्ये पथकातील सदस्य होते.
त्याचवेळी शासकीय वाहन चालक संतोष सातभाकरे हा त्याच्या (एमएच-२८, बीडब्ल्यू-१७१२) वाहनाने तेथे आला. त्याचे खासगी वाहन पथकाच्या शासकीय वाहनासमोर उभे केले. पथकाच्या वाहने गेट उघडून कर्मचारी संतोष रामदास भेंडे (वय ४४) यांची काॅलर पकडून खेचले. तसेच पुन्हा या रस्त्याने याल तर याद राखा, असे म्हटले. त्याचवेळी त्याठिकाणी सात ते आठ चारचाकी वाहने आली. त्यातील माफियांनी सातभाकरे याच्या सांगण्यावरून पथकातील कर्मचारी यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्या दहशतीने कर्मचारी घाबरले. त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. तसेच याबाबतच्या अहवालानुसार तहसीलदार दीपक बाजड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यावर जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सातभाकरेला निलंबित केल्याचा आदेश २६ मार्चला दिला. निलंबन काळात मुख्यालय लोणार राहणार आहे.
पथकातील पाच जणांना धमकी
अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त पथकामध्ये मनसगावचे मंडळ अधिकारी के. एम. तांबारे, तलाठी टी. व्ही. वानखडे, बी. यु. मोरे, जी. एन. मांटे, आडसूळचे कोतवाल संतोष भेंडे यांचा समावेश होता. त्या सर्वांना तुम्हाला पाहून घेण्याची धमकीही सातभाकरे याने दिल्याचे अहवालात नमूद आहे.