बुलडाण्याचा पारा १५.४ अंश सेल्सिअसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:57 PM2019-12-18T14:57:49+5:302019-12-18T14:57:58+5:30
११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: थंडीचा कडाका यंदाही बुलडाणेकरांचे जनजीवन विस्कळीत करण्याची शक्यता असून यंदाच्या हिवाळ््यातील निच्चांकी असे १५.४ अंश सेल्सिअस तापमान १७ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता नोंदविल्या गेले. दरम्यान गेल्या आठ दिवसापासून बुलडाण्याचे तापमान सातत्याने घसरत असून गत वर्षी २९ डिसेंबर रोजी नोंदविल्या गेल्या निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत येत्या काळात हे तापमान पोहोचते की काय?, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान अद्याप जिल्ह्यात रब्बीची अपेक्षीत अशी पेरणी झालेली नसली तरी जी काही पेरणी झाली आहे, त्या पिकांसाठी ही थंडी पोषक आहे. गेल्या तीन वर्षापासून बुलडाणा शहरातील तापमान हे हिवाळ््यात किमान एकदा निच्चांकी पातळीवर जात असल्याचा अनुभव असून यंदा हे रेकॉर्ड मोडल्या जाते की काय? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. समुद्रसपाटीपासून बुलडाण्याची उंची ही दोन हजार १९० फूट आहे. अर्थात दार्जिलिंगच्या एकतृतियांश ती आहे. त्यामुळे हिवाळ््यात बुलडाण्याचे तापमान कमी होण्याची तशी परंपराच आहे. यंदा वार्षिक सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त पडला आहे. त्यातच परतीच्या व अवकाळी पावसाने कहर केल्याने अद्यापही जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्द्रता आहे. परिणामी रब्बीचा पेराही अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही. त्यामुळे जे काही पेरले आहे, अशा पिकांना ही थंडी पोषक ठरणारी असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, दिवसभर बुलडाणा शहर परिसरात बाष्पयुक्त धुक्याची चार होती. पहाटे त्यामुळे दृष्यता अवघी दोन मिटरच्या आसपास असल्याचा अंदाज होता. दुपार दरम्यान, हे धुके कमी झाले मात्र सायंकाली पुन्हा त्यात वाढ झाली.
तापमान कक्षा ५.२ वर
मंगळवारी बुलडाणा शहराची तापमान कक्षा ही ५.२ वर होती. सकाळचे न्युनतम आणि सायंकाळचे अधिकतम तापमानातील तफावत म्हणजे तापमान कक्षा होय. साधारणत: ही तापमान कक्षा किमान १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असणे गरजेचे आहे. मात्र मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानाची आकडेवारी पाहता ही तामानकक्षा विषम असल्याचे दिसून येते.
तापमानात सातत्याने घट
बुलडाणा शहराच्या सकाळच्या तापमानामध्ये ११ डिसेंबर पासून सातत्याने घट होत आहे. ११ डिसेंबरला १६.६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे हे तापमान १२ आणि १५ डिसेंबरचा अपवाद वगळता सातत्याने कमी होत आहे. त्यातच आज तापमानाची नोंद ही यंदाच्या हिवाळ््यातील निच्चांकी नोंद आहे.