Buldhana: अस्वलाला लागला गोंधणीच्या झाडाचा लळा, उठसूठ बसतोय झाडाच्या शेंड्यावर, परिसरात भीतीचं वातावरण
By निलेश जोशी | Published: July 23, 2024 08:29 PM2024-07-23T20:29:16+5:302024-07-23T20:29:55+5:30
Buldhana News: बुलढाणा शहरालगत प्रादेशिक वनविभाग तथा ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या पट्ट्यात असलेल्या हनवतखेड शिवारातील गोंधणीच्या झाडाचा अस्वलाला लळा लागला असून गेल्या १५ दिवसापासून नित्यक्रमाने हे अस्वल या झाडावर चढून बसत आहे.
- नीलेश जोशी
बुलढाणा - शहरालगत प्रादेशिक वनविभाग तथा ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या पट्ट्यात असलेल्या हनवतखेड शिवारातील गोंधणीच्या झाडाचा अस्वलाला लळा लागला असून गेल्या १५ दिवसापासून नित्यक्रमाने हे अस्वल या झाडावर चढून बसत आहे. मात्र या प्रकरामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या ठिकाणी वनविभागाने रेस्क्यू टिमही तैनात केली होती.
बुलढाणा शहरा लगत हनवतखेड परिसरात बुलढाणा नगर पालिकेचे डंपिंग ग्राउंड असल्याने या ठिकाणी बिबट, अस्वल, तडस सारखे हिंस्त्र प्राणी अन्नच्या शोधात नेहमी येत असतात. अस्वलांच्या कुटुंबाचे नेहमीच येथे दर्शन घडते. त्यामुळे सायंकाळी या रस्त्याने जातांना अनेकांची घाबरगुंडी उडते. हमखास अस्वल रस्ता अेालांडतांना नागरिकांना दिसते. त्यामुळे अंधार पडायचा आत या भागात नागरिक त्यांची कामे आटोपून घेतात. दरम्यान कधीकधी पालिकेच्या डंपींग ग्राऊंडवर दिवसाच अस्वलाचे दर्शन होते.
दरम्यान याच हनवतखेड मार्गावर इंदूताई मेमोरियल शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या समोरच्या शेतात जवळपास २५ फुट उंचीच्या गोंधणीच्या झाडावर एक अस्वल शेंड्यावर जाऊन बसत आहे. जवळापस १५ दिवसापासून हाप्रकार सुरू आहे. त्यामुळे परिसरताली शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यातही असचा प्रकार समोर आला होता. दरम्यान २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे अस्वल पुन्हा या गोंधणीच्या झाडावर चढल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्याची माहिती त्वरित बुलढाणा शहर पोलिसांना आणि वनविभागाला तत्काळ माहिती देण्यात आली. वनविभागाची रेस्क्यू टीमही त्यानंतर घटनास्थळी दाखल झाली. बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी तेथील गर्दी हटविली व अस्वलाला खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला. जोरजोरात आरडाओरड केली, फटाके फोडले तरीही अस्वल खाली उतरला नाही.
रात्री उतरला खाली
दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वन विभागाची रेस्क्यू टीम परिसरात तैनात करण्यात आली होती. शेवटी रात्री दहा वाजेच्या सुमारास अस्वल झाडावरून खाली उतरले व जंगलाच्या दिशेने निघून गेले असल्याची माहिती वनविभागाने २३ जुलै रोजी सायंकाळी दिली.
२०२१ मध्येही होते दिसले
२०२१ मध्येही या झाडावर अस्वल दिले हाेते, असे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे त्याच्या लहानपणापासून हा भाग त्याच्या परिचयाचा असल्याने ते झाडावर प्रसंगी गोंधणे खाण्यासाठी चढले असावे. आताही त्याच उद्देशाने ते चढले असावे? असा कयास वनविभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला.