स्वच्छता अभियानात बुलडाणा अव्वल
By Admin | Published: August 14, 2015 12:15 AM2015-08-14T00:15:16+5:302015-08-14T00:15:16+5:30
जिल्ह्यात आठ हजार शौचालये; राज्यात बुलडाणा जिल्हा तिस-या क्रमांकावर.
बुलडाणा : शासनाच्यावतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात बुलडाणा जिल्ह्याने भरीव कामगिरी करीत विदर्भातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात आतापर्यत ८ हजार ७६८ शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्यात प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याचा असून, दुसर्या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा आहे., तर बुलडाणा जिल्हा तिसर्या क्रमांकावर आला आहे. शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे. घरा-घरांत व प्रत्येक गावाने शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. अशा गावांना शासनाच्यावतीने संत गाडेबाबा स्वच्छता पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील अनेक गावे या पुरस्काराने सन्मानित झाली आहेत. ज्या गावात व्यक्तिगत स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर होत नाही, अशा गावांना प्राधान्य देऊन ही योजना या गावात राबविण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अशा गावात व्यापक जनजागृती करून गावातील नागरिकांनी स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर करावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. याशिवाय पालिकाक्षेत्रात पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वैयक्तिक शौचालयाची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थींना स्वच्छतागृह बांधकामासाठी १२ हजार रुपये अनुदानही दिले जाते. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या नेतृत्वात ही कामे चांगल्या पद्धतीने झालीत. अजूनही ज्या गावात शौचालये नाहीत, तेथे शौचालय बनविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.