Buldhana: हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:33 PM2023-07-28T15:33:31+5:302023-07-28T15:34:42+5:30
Hanumansagar dam: अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले.
- अझहर अली
संग्रामपूर (बुलढाणा) : अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले. धरणात सध्या स्थिती ७१.४२ टक्के जलसाठा उपलब्ध असून शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास धरणातून वान नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
हनुमानसागर धरणातून वान नदीपात्रात ५२.०८ घ.मी./से पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे वान प्रकल्पाकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून वान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुरुवारी रात्री धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने पाण्याची आवक मोठ्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४०६.५० मी. असून धरणात सद्य:स्थितीच ७१.४२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर उपयुक्त जलसाठा ५८.५३ दलघमी एवढा आहे. हनुमानसागर धरणाचा पहिला आणि सहावा असे दोन दरवाजे ५० सेमी उघडण्यात आले. धरणातून वान नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने वान नदीला पूर आला.