टरबुजांचे भाव अर्ध्यावर, ६ रुपये किलाेने खरेदी, २५ रुपयांना विक्री; शेतकरी उद्ध्वस्त, व्यापारी मालामाल
By विवेक चांदुरकर | Published: April 9, 2024 02:24 PM2024-04-09T14:24:23+5:302024-04-09T14:25:17+5:30
Buldhana: गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत.
- विवेक चांदूरकर
खामगाव - गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करीत आहेत. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, व्यापारी मात्र मालामाल होत आहेत.
जिल्ह्यात सिंचनाची व्यवस`था असलेल्या अनेक शेतकर्यांनी टरबुजांची लागवड केली आहे. टरबुजाचे पीक दोन ते तीन महिन्यांचे असून, यातून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी आता टरबुजांची लागवड करण्याकडे वळले आहेत. यावर्षी सुरूवातीला टरबुजांना चांगला भाव मिळाला. शेतकर्यांना प्रतिक्विंटल ११०० ते १२०० रूपये दर मिळत होते. मात्र गत काही दिवसांत टरबुजाच्या किमतीत प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांकडून ४०० ते ५०० रूपये क्विंटलप्रमाणे टरबुजांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांना टरबुजाची शेती करणे परवडनासे झाले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तीन महिने श्रम करून पेरणी, फवारणी व काढणीचा खर्च करून शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागत आहे तर व्यापार्यांना एक ते दोन दिवसातच लाखो रूपयांचा नफा होत आहे.
१ लाख २७ हजार खर्च १ लाख १० हजारांचे उत्पादन
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील शेतकरी पवन बघे यांनी दोन एकरात टरबुजांची लागवड केली आहे. त्यांना दोन एकरात पेरणी, फवारणी व काढणीकरिता १ लाख २७ हजार रूपयांचा खर्च आला तर त्यांना केवळ १ लाख १० हजारांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे दोन एकरात तीन महिने रात्रंदिवस श्रम करूनही १७ ते २० हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
अवकाळीनंतर पडले भाव
जिल्ह्यात वातावरणातील बदलानंतर अवकाळी पाऊस झाला. तसेच दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसाने काही भागात टरबूज पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टरबुजाचे भाव पडले. याचा फटका सर्वच शेतकर्यांना बसत आहे. काही भागात पाऊस झालाच नाही. मात्र, चांगल्या टरबुजांचीही ५०० ते ६०० रूपयांनीच खरेदी करावी लागत आहे.
६ रूपये किलाेने खरेदी २५ रूपयांनी विक्री
टरबुजाला सुरूवातीला चांगला भाव मिळाला. मात्र नंतर टरबुजांचे भाव गडगडले. वादळी वारा व पावसामुळे टरबुजांचे नुकसान झाले. त्यातच भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तीन महिन्यांची मेहनत करूनही नुकसान सहन करावे लागले आहे.
- पवन बघे, टरबूज उत्पादक शेतकरी
चांगला भाव मिळेल या आशेने टरबुजाची लागवड केली. सुरूवातीला ११०० ते १२०० रूपये भाव मिळाला. मात्र, त्यानंतर भाव पडले. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या ७०० ते ८०० रूपये भाव आहे. आगामी दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे.
- ईश्वर पाचपोर
(टरबूज उत्पादक शेतकरी)