अध्यक्षपदाची लालसा नाही; राजीनामा देणारच - बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:12 PM2018-12-22T18:12:59+5:302018-12-22T18:23:52+5:30
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला.
मलकापूर : जिल्हा परिषदेत काम करताना विरोधकांचा विरोध स्वाभाविक आहे. मात्र सत्तेच सोबत असतांना बंडखोरीतून जिल्हाध्यक्ष बनलेल्या ध्रुपदराव सावळे यांच्यासारख्या नेत्यांचं ऐकून स्वकीय व लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला.
मुख्यमंत्री रविवारी जिल्ह्यात आहेत. त्या धरतीवर उमा तायडे यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधताना संबंधित इशारा दिला. सभागृहात सदस्यांची भूमिका हास्यास्पद होती. विषय काय कुणी समजूनच घेतला नाही. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्या धरतीवर पाणी पुरवठा योजनावर संपूर्ण जिल्ह्यातील लोणारपासून संग्रामपूरपर्यंत विषय होते. त्या विषयावर ठराव घेवून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपाययोजना हा उद्देश होता. जिल्ह्यातील आरोग्य विभागात ७० लाख रूपये पडून आहेत. हा निधी व्यपगत न होवू देता, खचार्साठी शासनाची मुदतवाढ मिळावी हा विषय होता. याखेरीज अनेक विकासकामांचे विषय होते. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा विषय असतांना त्याला विरोध हास्यास्पद नाही तर काय, असा प्रतिप्रश्न उमा तायडे यांनी केला.
जिल्ह्यातील राजकारणात लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी भूमिका घेतली. तर बंडखोर भाजपचे जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे, जे मुळात पक्षाचे नाही; त्यांच्या चिथावणीस बळी पडून भाजपच्याच लोकांनी विरोध करणे योग्य नाही. यात पक्षाची नाचक्की झाली. ही बाब लज्जास्पद आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला विरोध, अन तेही केंद्रात व राज्यात सत्ता असताना! हा विषय समजण्यापलिकडचा आहे, असेही उमा तायडे म्हणाल्या.
यारून आमदारांचं जि.प.सदस्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, हे स्पष्ट होते. परंतु या विरोधाची किंमत जि.प.तील सत्ताधारी पक्षांना येत्या लोकसभा निवडणुकीत मोजावी लागेल. जनता एवढी खुळी नाही.
जिल्हा परिषदेत निधी वाटपाचा सर्वांना योग्य न्याय मिळाला आहे. त्याचा आढावा मी सादर करणार आहे. माझ्या राजीनाम्याचे काय? तो मी देणारच! परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असे शेवटी उमा तायडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनीधी)