गतिमंद मुलासाठी बुलडाण्याचे दोघे ठरले देवदुत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 02:26 PM2020-01-28T14:26:33+5:302020-01-28T14:26:59+5:30
हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला.
बुलडाणा : तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. दरम्यान, वडिलांच्या १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला.
अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. अमरनाथ हा गतिमंद आहे. प्रत्येकवर्षी दिवाळीनंतर तो वडिलांसोबत बालाजीच्या दर्शनासाठी तिरूपतीला जात असे. यंदाही तो ९ जानेवारीला रेल्वेच्या स्लिपर कोचमधून निघाला असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास तो लघुशंकेसाठी गेला असता, एका प्रवाशाला अनावधानाने धक्का लागला. त्यातून वाद झाल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला हाताला धरून जनरल डब्यात नेऊन बसविले. थोड्या वेळाने वडिलांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले, तर मुलगा जाग्यावर नव्हता; त्यामुळे त्यांनी सारे डबे शोधले; परंतु मुलगा सापडला नाही. तिरूपती रेल्वेस्थानकावरून तो बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत होते; त्यामुळे मुलगा तिरूपतीमध्येच आहे, असा विश्वास वडिलांना होता. त्यांनी मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी दाद दिली नाही. कुणाला काही विचारायचे म्हटले, तरी भाषेची अडचण होती; परंतु तरीही वडिलांनी धीर सोडला नाही. स्वत: च त्याच्याविषयीचे पोस्टर तयार करून रिक्षातून जाऊन सगळीकडे चिकटवली. हॉटेल्स, गॅरेजेस, सरकारी दवाखाना, सार्वजनिक उद्यानात त्यांनी त्याचा शोध घेतला. कुणीतरी संपर्क साधला, तर लगेच मुलाकडे जाता यावे; यासाठी त्यांनी तिरूपतीमध्येच ठाण मांडले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांच्या या धडपडीला यश आले. त्यांचा मुलगा मूळच्या बुलडाण्याच्या असलेल्या कपीलतीर्थम परिसरातील ‘संत सावता माळी भोजनालया’त काहीतरी खायला मिळेल म्हणून तो गेला. हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला. वडील तिथेच रेल्वेस्टेशनवर होते. त्यांनी पळत जाऊन मुलाला मिठी मारली. त्याला पाहून त्यांच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मुलगा सापडल्यानंतर हे दोघेही बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.