‘उण्या’पखांचा १३३ जणांना ‘आधार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:22 PM2019-03-03T12:22:58+5:302019-03-03T12:23:35+5:30
खामगाव: कुणाला मुलं नाहीत...कुणाच्या पतीचं निधन झालयं...कुणाचा मुलगा अपघाती गेला...काहींना घरातून हाकलून लावले...तर कुणाची मुलं साभांळत नसल्याने निराधार झालेल्या अनेकांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ‘ती’ मोठी प्रेरणास्त्रोत बनू पाहतेय.
- अनिल गवई
खामगाव: कुणाला मुलं नाहीत...कुणाच्या पतीचं निधन झालयं...कुणाचा मुलगा अपघाती गेला...काहींना घरातून हाकलून लावले...तर कुणाची मुलं साभांळत नसल्याने निराधार झालेल्या अनेकांसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ‘ती’ मोठी प्रेरणास्त्रोत बनू पाहतेय. एक दोन नव्हे तर तब्बल १३३ पेक्षाजास्त जणांना ‘तिच्या’‘उण्या’पखांची छाया लाभतेय. तिच्या आधाराच्या पदराखाली आलेलेही इतरांच्या आयुष्यांत सकात्मकतेची पेरणी करण्यासाठी झटताहेत. ही कुण्या पुस्तकातील कथा नसून, बुलडाणा जिल्ह्यातील ‘सिंधू’ताई म्हणून नावारूपाला येत असलेल्या रेखाताई पोफळकर यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा आहे.
लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या रेखाताई पोफळकर यांचं गावकºयांनी एका सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून दिलं. संसारवेलीवर दोन फुलं उमलली. सुरळीत संसार सुरू असतानाच एक दिवस अघटीत घडले. रेखातार्इंच्या पतीचं अपघाती निधन झालं. संसार अर्ध्यावरच मोडला. कालांतराने सासरच्या मंडळींनी प्रचंड प्रताडना केली. छळ केला. वेदना दिल्या. ‘नको ते आळ’ घेत, घरातून हाकलून देखील लावलं. माहेर आणि सासर दोन्ही सुटलेल्या रेखाताई अनाथ झाल्या. एकवेळ आयुष्य संपवून टाकण्याचा टोकाचा निर्णयही त्यांनी आपल्या आयुष्यात घेतला. मात्र, दोन चिमुकल्यांची ‘ममता’आड आली. कधी रोजदांरी, कधी मेस तर कधी दुकानात काम करून हिंमतीने संसाराचा गाडा ओढण्यास सुरूवात केली. आता, भूतकाळातील वेदनादायक प्रसंग मागे टाकून अनाथ, अपंग, निराधार आणि निराश्रीतांच्या समस्यांचे त्या हिंमतीने निराकरण करत आहे. इतकेच नव्हे तर, बुलडाणा जिल्ह्यातील १३३ पेक्षा जास्त निराधारांसाठी ‘ती’ प्रेरणादायी आधार बनू पाहतेय. आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असतानाच, इतरांना ‘तिच्या’कृतीशील ‘उण्या’पंखांची ‘सावली’ माया-ममतेचा आधार बनत आहे.
जिल्हाधिकाºयांना लिहिलेल्या पत्रांमुळे बदलले भाग्य!
अनाथ, निराश्रीतांचं जगणं उजागर करावं म्हणून, बुलडाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ. निरूपमा डांगे यांना आपल्या अडाणी भाषेत पत्र लिहिलं. या पत्राचं अनेक दिवस उत्तर मिळालं नाही. प्रशासकीय कार्यालयात अनेक फाईल दबतात. गहाळ होतात. त्यात आपल्या सामान्यपत्राची काय? बिशाद, असा प्रश्न स्वत:शीच करून त्या निरूत्तर देखील झाल्या. परंतु, एके दिवशी संध्याकाळी एक फोन खणखणला. तिकडून आवाज आला. मी निरूपमा डांगे बोलतेय. भेटायला जिल्हाधिकारी कार्यालयात या! तेव्हा रेखातार्इंच्या पायाखालची जमीनच सरकली. ठरल्यानुसार जिल्हाधिकाºयांची भेट घेतली आणि त्यानंतर सुरू झाला रेखातार्इंच्या सामाजिक जीवनाचा अनोखा प्रवास. आता पाहता-पाहता त्या अनेकांसाठी आधाराची सावली बनल्यात. शिक्षणाची ज्योती सावित्रीमाई आपल्यासाठी आदर्श तर निरूपमाताई आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत असल्याची प्रामाणिक कबुलिही रेखाताई पोफळकर आवर्जून देतात.
रेखातार्इंचा संघर्षमय जीवन प्रवास!
बुलडाणा जिल्ह्यातील दुधा माहेर असलेल्या रेखातार्इंचा विवाह साखळी बु. येथील कैलास भगवान पोफळकर यांच्याशी २००६ मध्ये झाला. पाच वर्ष सुरळीत संसार सुरू असताना त्यांचे पती कैलास पोफळकर यांचे अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर सासरकडील मंडळीने त्यांचा छळ केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घरातून हाकलून लावले. त्यामुळे त्यांनी घर सोडले. उपजिविकेसाठी लासलगाव ते कल्याण रेल्वेत भाजीपाला विकला. नाशीक येथील एका शिक्षण संस्थेत नोकरी केली. त्यानंतर एका मेडीकल स्टोअर्सवर तीन हजार रुपये महिन्याने नोकरीही केली. मात्र, दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना त्यांची प्रंचड ओढाताणही झाली.मध्यतंरी पती अकाली जाण्याच्या धक्क्यातून न सावरल्याने, त्यांना मोठा मानसिक धक्काही बसला होता. औरंगाबाद येथील एका रूग्णालयात उपचार केले. त्यानंतर त्यांनी भूतकाळ विसरून स्वत:सोबतच संसाराला सावरले. आता त्या सामाजिक कार्यात गुंतल्या आहेत.
सुशीलातार्इंसह अनेकांची समर्थ साथ!
जिल्हाधिकाºयांच्या सकारात्मक सहकायार्मुळे मुळे रेखातार्इंच्या सामाजिक कार्यास आॅगस्ट २०१८ पासून सुरूवात झाली. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत रेखाताई स्वत:च्या परिवारासह महिला प्रगती केंद्रातंर्गत १३३ जणांसाठी प्रेरणादायी उर्जास्त्रोत बनल्या आहेत. रेखातार्इंचा आधार मिळालेही कृतज्ञतेने रेखाताईच्या सामाजिक कार्याला मदत करताहेत. यामध्ये रामेश्वर धाडे, सुशीला गवई, उषा मुळे, अलका हिवाळे आणि इतरांची मोलाची समर्थसाथ असल्याचे रेखाताई मान्य करतात.
विधवा, निराधार महिलांकडे हिन भावनेने पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलावा. निराश्रीतांचे जगणे भयंकर असते. आपण भोगलं ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये. यासाठी धडपड असून, वंचितांच्या सेवेसाठी पुढील आयुष्य समर्पित केले आहे. या कार्यात जिल्हाधिकारी निरूपमाताई डांगे यांची प्रेरणा आहे.
-रेखाताई पोफळकर, सामाजिक कार्यकर्ता, महिला प्रगती केंद्र, बुलडाणा.