बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:52 PM2019-09-14T12:52:59+5:302019-09-14T12:57:44+5:30

काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.

 Bulldana district food grains transport collapse | बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर!

बुलडाणा जिल्ह्यात रेशनच्या धान्य वाहतूकीला घरघर!

Next

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या धान्य वितरणासाठी धान्याची वाहतूक सध्या पर्यायी व्यवस्थेवर सुरू आहे. त्यामुळे धान्य वेळेवर पोहचण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. सध्या सुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार धान्याची वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करण्यासाठी कंत्राट निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असून लवकरच कंत्राट निश्चित होणार आहे.
भारतीय अन्न महामंडळ गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूक दारामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य वाहतूकीसाठी जिल्ह्याला जवळपास २६ वाहने लागतात. परंतू जिल्ह्यात पुरवठा विभागांतर्गत होणाºया धान्य वाहतूकीचा कंत्राट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव डिसेंबर २०१८ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार कंत्राट रद्द झाल्याने धान्य वाहतूकीसाठी अडचणी येऊ नये, याकरीता अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे दरपत्रक आले होते. त्याची पडताळणी करून जिल्ह्यातील धान्य वातूकीसाठी पर्यायी व्यवस्था जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली आहे. परंतू या पर्यायी व्यवस्थेमध्ये नियोजनाचा अभाव, वाहनांची कमतरता, अटी व नियमांचा भडीमार यासारख्या अनेक कारणांमुळे धान्य वितरणाला फटका बसत आहे. वेळेवर धान्य पोहचत नसल्याची ओरड रास्त भाव दुकानदारांमधून होत आहे. तात्पुरत्या स्वरूपातील ही पर्यायी वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरत असल्याने गोरगरीबांना सण, उत्सवाच्या काळात धान्यापासून वंचीत राहावे लागत आहे.
आता सुधारीत धान्य वितरण पद्धतीनुसार धान्य वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करून धान्य रास्त भाव दुकानात पोचविण्याचा कंत्राट निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी आॅनलाईन निविदा मागविणे व इतर प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.


१९ सप्टेंबरला उघड होईल कंत्राट
धान्य वाहतूकीचा कंत्राट निश्चित करण्यासाठी २७ आॅगस्टपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. कंत्राटदारांसाठी २९ आॅगस्टपर्यंत ई-निवेदेची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये पुरवठा विभागाच्या संकेस्थळावर नोंदणी करणे, अर्ज विक्री आदी बाबींचा समावेश होता. निविदा सादर करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत कंत्राटदारांना मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १९ सप्टेंबरला निविदा उघण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कंत्राट निश्चित करण्यात येणार आहे.


तीन वर्षाकरीता राहणार निश्चित कंत्राट
भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून शासकीय धान्य गोदामापर्यंतची अन्नधान्याची वाहतूक, त्यानंतर शासकीय धान्य गोदामातील प्रमाणित केलेले धान्य रास्त भाव दुकानांमध्ये उतरविणे, यासाठी २०१९ ते २०२२ या वर्षासाठी कंत्राट निश्चित करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन निश्चित कंत्राटही तीन वर्षासाठीच राहणार आहे.


सध्या जिल्ह्यातील धान्य वाहतूकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू ज्या ठिकाणी धान्य पोहचले नाही, त्या ठिकाणचा आढावा घेऊन धान्य वितरण करण्यात येईल. लवकरच धान्य वाहतूक व गोदामस्तरावरील हाताळणूक करून रास्तभाव दुकानात पोचविण्यासाठी कंत्राट निश्चित करण्यात येणार आहे.
- गणेश बेलाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

Web Title:  Bulldana district food grains transport collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.