बुलडाणेकरांनो, पाणी जरा जपून वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:45+5:302021-08-15T04:35:45+5:30
बुलडाणा : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात यंदा केवळ २२ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. यामुळेच शहराला पाच दिवसांआड ...
बुलडाणा : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात यंदा केवळ २२ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. यामुळेच शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याची सद्य:स्थिती असून, यामुळेच बुलडाणेकरांनो आता पाणी जपून वापरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण बुलडाणेकरांसाठी तंतोतंत लागू पडत आहे. कारण, बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प जलासाठा गोळा झाला आहे. यंदा दमदार पाऊसच न पडल्यामुळे जलाशयात समाधानकारक जलसाठाच जमा झाला नाही आहे. त्यामुळे अर्धा पावसाळा उरकूनही जलाशय कोरडेठाक पडल्याची स्थिती आहे. यामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी वितरणाचे नियोजन केले जात आहे. आता बुलडाणा शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक जण बांधकामेही करीत आहेत. त्यामुळे पाण्याचा अधिकचा वापर वाढला असून, पाणीपुरवठ्यावर ताण येत आहे.
शहरात साडेअकरा हजार नळधारक
बुलडाणा शहरात सध्या ११ हजार ५०० अधिकृत नळधारक आहेत. हा आकडा जरी कमी वाटत असला तरी बहुतांश परिसरात अनधिकृत नळजोडण्या करण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी पाइपलाइन फुटल्याचे चित्र असून, यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला आहे. या सर्वांमुळे पाणीपुरवठ्यार ताण पडत आहे.