शेगावात पुन्हा चालला बुलडोजर

By admin | Published: March 18, 2015 11:43 PM2015-03-18T23:43:20+5:302015-03-18T23:43:20+5:30

रखडलेली अतिक्रमणे काढलीय १५ मालमत्ता बाधित, अतिक्रमणात येणारे पक्के बांधकाम जमीनदोस्त.

Bulldozing again in Shiga | शेगावात पुन्हा चालला बुलडोजर

शेगावात पुन्हा चालला बुलडोजर

Next

शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव विकास आराखडा अंतर्गत शहरात सुरु असलेल्या विकास कामांमध्ये विविध कारणांनी रखडलेले अतिक्रमण १८ मार्च रोजी नगर परिषदेकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत पाडण्यात आले, तर अधिग्रहित केलेल्या जागाही मोकळ्या करण्यात आल्या. शेगाव शहरातील विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामांवर व्यावसायिकांकडून वेळोवेळी अतिक्रमणे केल्या जातात. शेगाव नगरपरिषदेने यासाठी अनेकवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतरही दुसर्‍या दिवशी स्थिती ह्यजैसे थेह्ण होत असल्याची बाब नागपूर उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली. याबाबत न्यायालयाने शेगाव नगरपरिषदेची कानउघाडणी करीत शहरातील रेल्वे स्थानक ते श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ पोलीस बंदोबस्तात काढून टाकावे, असे आदेश ३ डिसेंबर रोजी पारित करून एका आठवड्यात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्ते मोकळे करण्यात आले होते, मात्र काही ठिकाणी न्यायालयाचे स्थगनादेश, तर काही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या प्रक्रिया किचकट झाल्याने अतिक्रमण आणि अधिग्रहीत केलेल्या जागा ताब्यात घेण्यात आल्या नव्हत्या. यामध्ये १८ मार्च रोजी नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून १५ च्यावर अतिक्रमणे आणि अधिग्रहित जागेवरील इमारती जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. शहरातील गांधी चौक परिसरातील दोन इमारतींसह एमएसईबी चौक ते शाळा क्र. ५ दरम्यान असलेली अतिक्रमणे आणि अधिग्रहित करण्यात आलेल्या जागा मोकळ्या करण्यात आल्या.

Web Title: Bulldozing again in Shiga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.