कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे अंगलट; पोलिसांची कारवाई
By अनिल गवई | Published: March 14, 2023 08:11 PM2023-03-14T20:11:40+5:302023-03-14T20:12:52+5:30
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
खामगाव- कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे दोन बुलेट स्वारांच्या अंगलट आले. शहर पोलीसांच्या कारवाईनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधितांना १८५०० रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे खामगाव शहरातील बेशिस्त वाहन धारकांसोबतच वाहनाच्या सायलेंसरमध्ये छेडछाड करून वाहन चालविणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एमएच २८ एएक्स ३०३० क्रमांकाच्या बुलेट स्वाराला साडे आठ हजार रूपये तर एमएच २८ १७८७ क्रमांकाच्या बुलेट मालकाला दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अमोल कोळी आणि शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक शांती कुमार पाटील यांनी वाहनांची तपासणी केली. संबंधित वाहन चालकाविरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जलंब नाका, दीपाली नगर, अमृत नगर या परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान ट्रिपलसिट दुचाकी चालविणे, सुसाट गाडया पळविणे, विना लायसन्स दुचाकी चालविणे, कर्कश आवाजात हॉर्न वाजविणे, फटाक्याच्या आवाजाचे बुलेट चालविणे अशा २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर यापैकी ३ बुलेट ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. तीन पैकी दोन बुलेट स्वारांच्या कर्णकर्कश आवाजात बुलटे चालविणे अंगलट आले आहे.