समृद्धी महामार्गालगतच ५३ गावांजवळून धावणार बुलेट ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 10:36 AM2021-07-10T10:36:46+5:302021-07-10T10:36:53+5:30
Bullet train will run through 53 villages along Samrudhi Highway : बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या हवाई लिडार सर्वेक्षणानंतर आता बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भाने लवकरच सार्वजनिक सुनावणी घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही सुनावणी होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासही दोन दिवसांपूर्वीच नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे (एनएचआरसी) एक पत्र मिळाले आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या तालुक्यांतील जवळपास ५३ गावांतून या बुलेट ट्रेनचा प्रस्तावित मार्ग आहे. देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गांपैकी मुंबई-नागपूर हा एक ७३६ किमी लांबीचा महत्त्वपूर्ण मार्ग असून प्राधान्य क्रमाने तो पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न आहेत. यासंदर्भाने मार्च महिन्यादरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. आता या मार्गामुळे सामाजिक आणि पर्यावरणावर नेमका काय प्रभाव पडेल, हे मुद्दे घेऊन आता २२ जुलै रोजी सार्वजनिक सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.
समृद्धीलगतच प्रस्तावित मार्ग
समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित असून यासंदर्भात आलेल्या काही हरकती व सूचनांच्या आधारावर प्रसंगी यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणत: समृद्धी महामार्गालाच समांतर किमान एक किमी अंतरावरून हा मार्ग जाणार असल्याचे संकेत आहे. बुलडाणा जिल्ह्यात डोणगावनजीक २६९ प्लस २६ चेनिंगपासून ते ३५२ प्ल्स ६१ चेनिंगदरम्यान जिल्ह्यातील हा प्रस्तावित मार्ग असून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांजवळून तो जाईल. मात्र, प्रत्यक्षात सार्वजनिक सुनावणीनंतरच त्यातील काही बाबी स्पष्ट होतील.