बोंद्रे करताहेत शेतकऱ्यांची दिशाभूल- महाले
By admin | Published: June 3, 2017 12:25 AM2017-06-03T00:25:25+5:302017-06-03T00:25:25+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा आक्रमक : बाजार समिती सचिवांना विचारला जाब!
चिखली : तूर खरेदीतील अनियमितता, कृषी मंत्र्यांनी दिलेला स्थगनादेश डावलून कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मार्केट यार्डात शेतमाल विकण्यासाठी येणाऱ्या कास्तकारांची बाजार समिती संचालक व कर्मचाऱ्यांची संगनमताने होणारी लूट अश्या पद्धतीचे घाणेरडे राजकारण आ. राहुल बोंद्रे यांच्या इशाऱ्यावर चिखली बाजार समितीत सुरू असून, स्वत:च्या राजकीय लाभासाठी स्टंटबाजी करणारे आ.बोंद्रे हे राज्य व केंद्र सरकारची बदनामी आणि जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांनी केला.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडून ते प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ जून रोजी आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी जि.प.सभापती श्वेता महाले पाटील यांनी आ.राहुल बोंद्रे व बाजार समिती संचालकांवर हे आरोप केले. दरम्यान श्वेता महाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.विजय कोठारी यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अजय मिरकड यांना घेराव घालून जाब विचारला. महाराष्ट्र शासनाकडून सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते; परंतु बुलडाणा जिल्ह्यात या महत्त्वपूर्ण योजनेची अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नाही. चिखली बाजार समितीमार्फत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांची यादीच शासनापर्यंत न पोहोचल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत, असा आरोप करीत सदर यादी शासनाकडे अद्याप का पोहोचली नाही, याबाबत बाजार समितीचे सचिव अजय मिरकड यांना धारेवर धरले. तसेच राज्य सरकारकडून प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिले जात असताना केवळ चिखली बाजार समितीचा अक्षम्य हलगर्जीपणा व घाणेरड्या राजकारणामुळे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत आहेत, असा आरोपदेखील भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केला, तसेच शेतमाल तारण योजनादेखील चिखली बाजार समितीने राबवली नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवित असताना चिखली बाजार समितीमध्ये मात्र राजकीय हेतूने या योजनांची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे तातडीने निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्वेता महाले पाटील यांनी बाजार समिती प्रशासनाला यावेळी दिला. यावेळी बाजार समितीचे संचालक काशिनाथ बोंद्रे, अॅड. मंगेश व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय चेके पाटील, स्वप्नील गुप्ता, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, शहराध्यक्ष सुरेंद्र पांडे, संचालक विकास डाळीमकर, न.प.सभापती सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, नगरसेवक पंडितराव देशमुख, प्रा. राजू गवई, गोपाल देव्हडे, शेख अनिस, हनुमंत भवर, डिगांबर राऊत, शिवराज पाटील, नारायणराव भवर, चेतन देशमुख, अनमोल ढोरे, रमेश आकाळ, बलदेविसंग सपकाळ, राजेंद्र हरपाळे, विकास मोरे, अनिल अंभोरे, यासह पटेल, संतोष काळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
लेखी आश्वासन व स्थळ पंचनामा
बाजार समितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोयाबीन अनुदान योजनेतील दिरंगाई, तूर खरेदीतील अनियमितता, शेतमाल तारण योजनेला बसणारा खो, कास्तकारांची लूट यावर जाब विचारण्यासह बाजार समितीचे सचिव मिरकड यांच्याकडून सोयाबीन अनुदान योजनेसंबंधीची यादी तातडीने शासनाकडे सादर करण्याचे लेखी घेतल्यानंतर सभापती श्वेता महाले पाटील यांनी तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. तहसीलदार गायकवाड यांनी तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील प्रभारी गारोळे यांना लगोलग पाचारण केले असता, अधिकारी वर्गासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एमआयडीसी स्थित टीएमसी मार्केट यार्डातील तूर खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी व पंचनामा करण्यात आला. या केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेली संपूर्ण तूर शासनाने नाफेड मार्फत खरेदी केली असून, येथे खरेदीविना तूर आढळली नसल्याचे प्रमाणपत्र सहकार उपनिबंधक कार्यालयाने दिले आहे.