बुलडाणा-मलकापूर मार्गावर बस-कारचा अपघात; महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:06 PM2019-11-11T14:06:35+5:302019-11-11T14:06:53+5:30
या अपघातात कार मधील संध्या अशोक जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली. तर, इतर चौघे जण किरकोळ जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : एसटी बस व कारची समोरा-समोर धडक होऊन कारमधील एक महिला ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजता घडली. हा अपघातबुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा शहरात घडला.
भुसावळ आगाराची जळगाव खान्देश-मेहकर बस (क्रमांक एम-एच- १४ बी-टी- २६९८) प्रवाशी घेऊन बुलडाण्याकडे जात होती. या बसमध्ये चालक किरण आनंदा सातपुते (५६, रा. खडका ता. भुसावळ) हे होते. बुलडाणा येथील अशोक मातादीन जैस्वाल (५५), संध्या अशोक जैस्वाल (५२), सोनाली स्वर्णीम जैस्वाल (२९), स्वर्णीम विमलचंद जैस्वाल (३२), नात अद्विता स्वर्णीम जैस्वाल (१ वर्ष) हे पाच जण कार (क्रमांक एम-एच-०२- ए- यू- १६११) ने बुलडाण्याकडून मलकापूरकडे जात होते. दरम्यान, बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोताळा येथील बुलडाणा अर्बन शाखेसमोर एसटी बस व इंडिका कारची जबर धडक झाली. या अपघातात कार मधील संध्या अशोक जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली. तर, इतर चौघे जण किरकोळ जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील कैलास गावंडे यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना आपल्या वाहनातून तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे रेफर करण्यात आले. मात्र संध्या अशोक जैस्वाल यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बोराखेडीचे एएसआय गजानन वाघ, मिलींद सोनोने, पोलीस हेड काँस्टेबल वानखेडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.