ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:55+5:302021-01-08T05:50:55+5:30
साखरखेर्डा : अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बस सेवा सुरू हाेऊन तीन महिने झाले असले तरी ग्रामीण भागात अजूनही बस सेवा सुरू ...
साखरखेर्डा : अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बस सेवा सुरू हाेऊन तीन महिने झाले असले तरी ग्रामीण भागात अजूनही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. मेहकर आगार प्रमुखाने केवळ लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ॲटोरिक्षा किंवा काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. त्यातही एसटी बसपेक्षा दुप्पट भाडे आकारल्या जात आहे. याची दखल घेऊन ग्रामीण भागात एसटी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
मेहकर येथून साखरखेर्डा गावाचे अंतर २२ किमी असून चिखली शहरापासून ३३ किमी आहे. सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, दरेगाव, गुंज, गोरेगाव, उमनगाव, काटेपांग्री, सायाळा, वडगाव माळी, हनवतखेड, हिवरागडलिंग, सायाळा, देऊळगाव कोळ, कोनाटी ही खेडी लव्हाळा ते साखरखेर्डा-दुसरबीड रस्त्याच्या ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहेत. या खेड्यातून प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असेल तर लव्हाळा, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा येथे यावे लागते. त्यासाठी ऑटो चालकाला किंवा काळीपिवळी चालकाला जादा भाडे द्यावे लागते. त्यातही वेळ चुकली तर परत गावी यावे लागते. हा आर्थिक त्रास आणि वेळ जात असल्याने प्रवासी वैतागून जात आहे. या बाबींची दखल घेऊन मेहकर आगार प्रमुखांनी वडगाव माळी मार्ग साखरखेर्डा, मेहकर ते दरेगाव, मेहकर ते साखरखेर्डा मार्ग जालना, सायाळा मार्ग साखरखेर्डा बसेस सुरू कराव्यात. चिखली आगार प्रमुखांनी चिखली ते साखरखेर्डा मार्ग राताळी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
खामगाव आगार प्रमुखांनी खामगाव ते जालना मार्गे साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगाव राजा, सिंदखेडराजा ही बस काही कारण नसताना १५ दिवसांपासून बंद केली आहे. तसेच लव्हाळा ते साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड या मार्गावर केवळ तीनच बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी भागवत मंडळकर, दत्ता लष्कर यांनी केली आहे.