एसटी बस- ट्रॅक्टरची समोरासमोर धडक, 12 जखमी, बस चालकासह तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:26 AM2020-01-11T10:26:22+5:302020-01-11T11:07:36+5:30
प्राथमिक माहितीनुसार जीवित हानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहे. काही विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहेत
बुलडाणा - संग्रामपूर येथील स्मशानभूमीजवळ एसटी बस व ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर अपघात झाल्याची घटना सकाळी 7 वाजता घडली. या अपघातात बारा जण जखमी झाले असल्याची माहिती तामगाव पोलिसांनी दिली आहे. जखमींपैकी बसचालकासह तिघांची प्रकृती गंभीर आहे.
जळगाव आगाराची बस क्र. एम एच 40 एन 9489 सोनाळा बुलढाणा वरवटकडून जळगाव जामोदकडे जात असतांना संग्रामपूर कडून येणारा ट्रॅक्टर क्र. एम एच 28 बी 3262 या दोन्ही वाहनांमध्ये अपघात घडला. यात 12 जन जखमी झाले. तर तीन जण गंभीर आहेत. एसटी बस चालक सुनील इंगळे यांच्यासह दोन गंभीर जखमींना अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टरच्या ट्रॉली ची हायड्रोलिक तुटल्याने ट्रॉली पूर्णपणे तुटून खाली पडली. तर एसटी बसची एक बाजू चा पत्रा फाटला आहे. पोलिसांकडून प्राथमिक माहितीनुसार जीवित हानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहे. काही विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आहेत.