खामगावातील अडत व्यावसायिकाला एक कोटी ३७ लाखांचा गंडा!
By अनिल गवई | Published: January 4, 2024 02:24 PM2024-01-04T14:24:32+5:302024-01-04T14:25:26+5:30
नांदेड येथील व्यावसायिकाने फसविले: शहर पोलीसांत गुन्हा दाखल.
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: येथील एका अडत व्यावसायिकाला नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिकाने चक्क एक कोटी ३७ लाख ३४ हजार ३६६ रुपयांचा गंडा घातला. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी उजेडात आला. याप्रकरणी तक्रारीवरून नांदेड येथील व्यावसायिकाविरोधात शहर पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, खामगाव येथील अडत व्यावसायिक प्रमोद प्रेमसुखदास चांडक (४८, रा. केला नगर, खामगाव) यांनी देवानंद गोविंदप्रसाद धूत (४३, रा.भोकर, जि. नांदेड) या व्यावसायिकाच्या कंपनीकडे प्रसाद कॅनव्हासिंग द्वारे तीन कोटी २२ लक्ष, ३४, ३६६ रूपयांचा तुरीचा माल स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत दुकानातून पाठविला आहे. ३ जानेवारीपूर्वी झालेल्या व्यवहारापोटी तक्रारदाराला संबंधितांकडून धनादेशाद्वारे एक कोटी ८५ लाख रूपये प्राप्त झाले. परंतु उर्वरीत एक कोटी ३७ लाख रूपये ३६६ रुपयांची रक्कम देण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे तक्रारदार चांडक यांनी तक्रारीत म्हटले. वारंवार तगादा लावल्यानंतरही देवानंद धूत याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून विश्वासघात झाल्याचा आरोप प्रमोद चांडक यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला.
या तक्रारीवरून शहर पोलीसांनी देवानंद धूत याच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.खामगावातील डाळ प्रकरणी कोट्यवधी रूपयांच्या करचुकवेगिरीचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच, आता हा नवीन फसवणुकीचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे खामगावतील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.