सीसीआयची ८0 हजार क्विंटल कापूस खरेदी
By admin | Published: December 25, 2014 11:58 PM2014-12-25T23:58:29+5:302014-12-25T23:58:29+5:30
शेतकर्यांना भाववाढीची प्रतीक्षाच : गुणवत्ता पाहून घेतल्या जातो कापूस.
खामगाव (बुलडाणा) : भारतीय कापूस निगम लि. (सीसीआय) च्यावतीने कापूस खरेदी सुरू असून खामगाव केंद्रावर आतापयर्ंत ८0 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर या कापसापासून सद्यास्थितीत १४ हजार रूईच्या गाठी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही कापसाच्या भावात दरवाढ न झाल्याने शेतकर्यांना भाववाढीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
जिल्ह्यात पणन महासंघ व सिसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. पणन महासंघाचे जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे तर सीसीआयचे खामगाव, नांदुरा व मलकापूर येथे खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. सीसीआयने १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे. पणन महासंघाप्रमाणेच बन्नी ब्रम्हाला ४0२५ ते ४0५0 असा तर एचफोरला ३ हजार ९५0 दर ठरविण्यात आला आहे. कापसाची गुणवत्ता पाहून दर्जा ठरविल्या जातो. खामगावात सहा ठिकाणी खरेदी होते. १५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान खामगाव येथे ७८ हजार ४00 क्विंटल तर नांदुरा येथील बालाजी जिनिंगमध्ये १७ हजार १८५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. एकूणच या भावात उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकर्यांकडून भाववाढीची मागणी होत आहे. तर अनेक शेतकरी भाववाढीची प्रतीक्षा करीत आहेत.