बाजार समितीच्या आवारातच धान्य खरेदी करा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:12+5:302021-01-08T05:53:12+5:30
किनगाव जट्टू बीबी : बीबी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंतर्गत शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करणारे व्यापारी कुठेही दुकाने लावून ...
किनगाव जट्टू बीबी : बीबी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती अंतर्गत शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करणारे व्यापारी कुठेही दुकाने लावून धान्य खरेदी करीत आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना उपबाजार समितीच्या आवारातच धान्य खरेदी करण्याचे आदेश देण्याची मागणी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सहदेव लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे साहाय्यक निबंधक सहकारी संस्था, लोणार यांच्याकडे केली आहे. लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत बीबी येथे उपबाजार समिती असून, परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी-विक्रीची पूर्वी बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्यांची दुकाने होती. ते तेथेच शेतमालाची बोली बोलून व्यापारी जास्त भावात घेत होते. परंतु गत काही वर्षांपासून शासकीय खरेदीदारांनी आपापल्या सोयीने मार्केटच्या बाहेर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. व्यापाऱ्यांची दुकाने दूर दूर असल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाची हरासी लावली जात नाही. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्याचा माल मातीमोल भावात खरेदी करीत असल्याने स्वतःचं चांगभलं व्यापारी करून घेत आहे. त्यामुळे शेतमाल खरेदीदारांची शासकीय सर्व दुकाने बाजार समितीच्या आवारात त्यांच्या देखरेखीखाली सुरू करावीत; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सहदेव लाड व उपाध्यक्ष अनिल मोरे यांनी निवेदनात दिला आहे.
नियमानुसार कार्यवाही करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार यांना कळविले आहे.
- एन. के. मेहकरकर, सहकार अधिकारी श्रेणी-१, लोणार