उपबाजार समितीच्या आवारातच धान्य खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:00+5:302021-09-17T04:41:00+5:30
किनगाव जट्टू : लाेणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिबी उपबाजाराच्या बाहेर काही व्यापारी धान्य ...
किनगाव जट्टू : लाेणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिबी उपबाजाराच्या बाहेर काही व्यापारी धान्य खरेदी करतात़ ही धान्य खरेदी उपबाजाराच्या आवारातच करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ मागणी मान्य न झाल्यास उपाेषण करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या बीबी उपबाजार समिती येथील काही व्यापारी बाजार समितीच्या आवाराबाहेर दुकाने लावून गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करत आहे़ त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हर्राशी न करता व्यापारी मनमानी कारभाराने शेतकऱ्यांचा शेतीमाल मातीमोल भावात खरेदी करत आहे़ यासंदर्भात संबंधित विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन दिली आहेत़ परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही़ बीबी येथील बाजार समितीच्या आवाराबाहेर कृषिमाल खरेदी करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व सर्व परवानाधारक व्यापाऱ्यांची दुकाने बाजार समितीच्या आवारात आणून शेतीमालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे़ मागणी मान्य न झाल्यास २९ सप्टेंबरपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी दिला आहे़