घटस्फोटाची धमकी मिळाल्याने बाळ विकत घेण्याचा सौदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:30 PM2017-10-02T14:30:14+5:302017-10-02T14:30:14+5:30
अनिल गवई
खामगाव : पतीकडून घटस्फोटाची धमकी मिळाल्यानेच दिल्लीस्थित मल्लिका खानने बाळ विकत घेण्याचा सौदा केला. यातूनच स्थानिक सामान्य रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सुंदर व गुटगुटीत बाळासाठी मल्लिकाचा आग्रह असल्यानेच सुमैय्या परवीनचे बाळ चोरुन नेण्यात आले.
स्थानिक सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्या परवीन या महिलेचे नवजात बाळ पळवून नेले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केल्यानंतर तिसºया दिवशी सिल्लोड येथून महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तब्बल पाचव्या दिवशी रविवारी अपहृत बाळ दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बाळाचा अपहरणकर्त्यांनी ३५ लाखात विकण्याचा सौदा केला होता. हे बाळ दिल्ली येथील रहिवाशी मल्लिका हिंमत खान या महिलेने विकत घेतले होते. याबाबत केलेल्या चौकशीमध्ये मल्लिका हिला मूलबाळ होत नसल्याने तिचा दुबईस्थित पती हिंमत खान याने घटस्फोटाची धमकी दिली होती. त्यामुळे तिने बाळ खरेदी करण्याचे ठरविले. यासाठी रेबिका पिल्ले (प्रीतीची आई) रा. खामगाव या महिलेशीे बाळ खरेदी करण्याचा सौदा केला. त्यानुसार रेबिका हिने स्थानिक सामान्य रुग्णालयातून सुमैय्याचे बाळ पळवून ते मल्लिकाला विकले. तर आरोपी प्रीती हिने मोहसीन हुसैन खान याच्याशी वर्षभराच्या प्रेमसंबंधातून दुसरे लग्न केलेले असून तिचा पतीचीही या प्रकरणात साथ मिळाली. एखाद्या सिनेमाला साजेशा या अपहरण नाट्याची पटकथा ही रेबिकाने रचली असल्याचे दिसून येते.
सुंदर बाळासाठी आग्रह
पतीला संशय येवू नये व आपलेच बाळ वाटावे यासाठी मल्लिकाने सुंदर व गुटगुटीत बाळच पाहिजे अशी अट घातली होती. त्यामुळे रेबिकाने पहिल्यांदा दाखविलेले अन्य महिलेचे बाळ मल्लिकाने नापंसत केले व सुमैय्याचे बाळ पसंत करुन ते आणण्यास सांगितले. त्यावरुन रेबिकाने तिची मुलगी प्रीतीमार्फत पहाटेच्या वेळी डाव साधला.
बबिताने फिरविला शब्द
मल्लिकाला बाळ देण्यासाठी रेबिकाने शहरातील (काल्पनिक नाव) बबिता नामक महिलेशी सौदा केला होता. तिला प्रसुतीसाठी सामान्य रुग्णालयात भरतीही केले. मात्र तीन मुलीनंतर चवथ्या वेळेस मुलगा झाल्याने तिने शब्द फिरविला. त्यामुळे रेबिकाने दुसरे बाळ शोधले.
दुचाकीवरुन लागला सुगावा
रेबिकाला सामान्य रुग्णालयात पोहचविण्यासाठी खामगाव येथील एमएच २८ एन ९८१० या दुचाकीचा वापर झाला होता. तसेच बाळ पळविणाºया चारचाकी वाहनाचा चालक राजे जहाँगीर खान हा मस्तान चौकात मुक्कामी होता. सदर स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला असल्याची माहिती आहे.
मुस्लीम समाजाची सामंजस्याची भूमिका
सामान्य रुग्णालयातून बाळ चोरी गेल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच या घटनेच्या तपासाला गती दिली. महत्वपूर्ण धागे दोरेही पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत मोर्चा रद्द केला.