बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांची संवर्गनिहाय पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:37 PM2019-01-08T13:37:58+5:302019-01-08T13:38:24+5:30
बुलडाणा: शिक्षकांच्या बिंदू नामावली अंतर्गत जिल्ह्यात सध्या शिक्षकांची जात प्रवर्ग निहाय माहिती गोळा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: शिक्षकांच्या बिंदू नामावली अंतर्गत जिल्ह्यात सध्या शिक्षकांची जात प्रवर्ग निहाय माहिती गोळा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये जात वैधताप्रमाणपत्र, सेवा जेष्ठता, मुळ नियुक्ती आदेश आदी बाबींची पडताळणी करण्यात येत असून जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाला शिक्षकांच्या संवर्ग निहाय याद्या करण्याचे नवे काम सध्या लागले आहे.
जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामध्ये नुकतीच मुख्यध्यापक पदोन्नती व शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पार पडली. शिक्षकांचे समायोजन, बदली, पदोन्नती यासारखे कामे शैक्षणिक सत्र सुरू असताना हाती घेतल्याने त्याचा परिणाम शिक्षणावर होतो. परंतू या परिणामाला न जुमानता शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सत्र सुरू असतानाच नवनविन प्रयोग प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या १२२ मुख्यध्यापकांच्या पदोन्नती व शिक्षकांच्या समायोजनानंतर शिक्षकांची बिंदू नामावलीची प्रक्रिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद शिक्षकांची जाग प्रवर्गनिहाय माहिती गोळा करण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्यता आली होती. शिक्षकांचे रोस्टर तयार करण्याचे काम गेल्या पाच दिवसांपासून जिल्हाभरातील जिल्हा परिषद केंद्राच्या ठिकाणी सुरू आहे. केंद्रावर माहिती गोळा केल्यानंतर पंचायत समितीवर तालुक्यातील सर्व शिक्षकांची माहिती एकत्र केल्या जात आहे. त्यानंतर जात प्रवर्गनिहाय तयार झालेल्या शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदमध्ये जमा करण्यात येत आहेत. शिक्षकांच्या याद्या तयार करण्यासाठी सध्या जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग व्यस्त असल्याचे दिसून येते.
अशी मिळविली जाते माहिती
जिल्ह्यात सुरू असलेल्या शिक्षकांच्या बिंदू नमावलीमध्ये संवर्गाचे नाव, वेतनश्रेणी, सरळसेवा भरती, मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, प्रवर्ग अशी प्रत्येक पंचायत समिती स्तरावरून माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षकांकडून त्यांच्या जातीचा प्रवर्ग, नियुक्ती तारीख, जन्मतारीख, जातवैधता प्रमाणपत्र, सेवाजेष्ठता वर्ष, सेवा जेष्ठता क्रमांक आदी माहिती गोळा केल्या जात आहे.
५ जानेवारीचा मुहूर्त टळला
शिक्षकांची जात प्रवर्गनिहाय माहिती गोळा करण्यासाठी ५ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र ५ जानेवारीपर्यंत काही पंचायत समितीस्तरावर याची माहितीच पोहचली नाही. जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यातील काहीच पंचायत समितीच्या शिक्षकांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता १० जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या याद्या पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षण विभागातील १० कर्मचारी कामाला लागले आहेत.
पवित्र पोर्टल ‘अपडेट’ करण्याच्या हालचाली
शिक्षकांचे रोस्टर तयार करून त्यात कोणत्या जात प्रवर्गाचे किती पदे रिक्त आहेत, किती शिक्षकांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, प्रवर्गनिहाय कार्यरत शिक्षकांची संख्या याची माहिती समोर येणार आहे. या माहितीच्या अनुषंगाने शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल ‘अपडेट’ करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.
शिक्षकांच्या बिंदू नामावलीचे काम सध्या सुरू आहे. यासाठी पंचायत समितीस्तरावरून शिक्षकांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या जात प्रवर्गनिहाय माहिती गोळा करण्याचे हे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.
- अनिल अकाळ,
उपशिक्षणाधिकारी, जि. प. बुलडाणा.