काेराेनामुळे इतर आजारांचे ५० टक्के रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:50 AM2021-01-08T05:50:47+5:302021-01-08T05:50:47+5:30
बुलडाणा : मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर इतर आजारांचे रुग्ण ५० टक्यांनी घटल्याचे चित्र आहे. सन २०१८ ते ...
बुलडाणा : मार्च महिन्यापासून काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर इतर आजारांचे रुग्ण ५० टक्यांनी घटल्याचे चित्र आहे. सन २०१८ ते २०२०ची तुलना केल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मार्च महिन्यानंतर माेठ्या प्रमाणात घटली आहे.
काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर नागरिकांमध्ये आराेग्यविषयक जागृती वाढली आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदींसह इतर खबरदारीचे उपाय केल्याने अन्य आजारांचा त्रास कमी झाला. तसेच एरव्ही दुर्लक्षित असलेल्या सर्दी, खाेकला आणि तापाकडे काेराेनाच्या भीतीने जास्तच लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०२०च्या जानेवारी महिन्यात २१ हजार ४४१ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले हाेते. एप्रिलमध्ये लाॅकडाऊन असल्यामुळे व काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केवळ ४ हजार २०१ रुग्णांनी उपचार घेतले. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून विविध उपाययाेजना नागरिकांकडून करण्यात येत आहेत. मास्कचा नियमित वापर करण्यात येत असल्याने अनेक आजारांपासून नागरिकांचे संरक्षण हाेत आहे. काेराेना संसर्गामुळे नागरिक स्वच्छतेविषयी अधिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे ऑक्टाेबर महिन्यात केवळ ८ हजार ३४१ रुग्णांना उपचार घेण्याची गरज भासली. राेगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठीही अनेकांनी प्रयत्न केल्याने रुग्णसंख्या माेठ्या प्रमाणात घटली आहे.
काेराेनाच्या भीतीने सरकारी रुग्णालयांकडे पाठ
काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरूवातीला भीतीचे वातावरण हाेते. सर्दी, खाेकला, ताप आला तरी नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत हाेते. आता हीच लक्षणे काेराेनाची असल्याने नागरिक सरकारी रुग्णालयांत जातच नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे अनेकजण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याला प्राधान्य देत असल्याने सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या घटली आहे.