१५ दिवसानंतर झाली कालव्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:28 AM2021-01-04T04:28:53+5:302021-01-04T04:28:53+5:30
पेनटाकळी शिवारात १६ डिसेंबर रोजी कालवा फुटल्याने गट नंबर ६५ मधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान ...
पेनटाकळी शिवारात १६ डिसेंबर रोजी कालवा फुटल्याने गट नंबर ६५ मधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊन शेतमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा कालवा याच ठिकाणी अगोदर दोन ते तीन वेळेस फुटला होता; मात्र त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. या कालव्यामध्ये अनेक झाडेझुडपे वाढत असल्याने या कालव्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कालव्याच्या खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याकरिता शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभाग व महासंघाने सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा कालवा फुटला. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. हा कालवा दुरुस्त करण्याकरिता पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाचे कर्मचारी गेले असता, शेतकऱ्यांनी कालवा दुरुस्तीला विरोध केला होता; मात्र समन्वय साधत पाटबंधारे बांधकाम विभागाने कालव्याची दुरुस्ती केली. शनिवारी या कालव्याद्वारे पुढील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र परत हा कालवा फुटू नये, यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
रब्बी पिकांना फायदा
पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याचे सिंचन क्षेत्र ६८२ हेक्टर आहे. तर शाखा कालव्याचे सिंचन क्षेत्र ३ हजार ८९३ इतके आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका व ज्वारी पिकांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती पेनटाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता चौगुले यांनी दिली.