रद्द केलेल्या कृषी सेवा केंद्र परवानाधारकांची वरिष्ठांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:25 PM2020-09-29T12:25:12+5:302020-09-29T12:25:33+5:30
दोषी आढळलेल्या ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिला.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिलेल्या निदेर्शानुसार युरियाची अधिक खरेदी करणाऱ्या २० ग्राहकांच्या तपासणीअंती काळाबाजार केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्ह्यातील ११ कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिला. त्यापैकी काहींनी विभागीय कृषी सहसंचालकांकडे धाव घेतल्याची माहिती आहे.
अनुदानीत युरिया खताचा काळाबाजार रोखणे तसेच त्याचा उद्योगामध्ये होणारा वापर रोखण्यासाठी निमकोटेड युरियाचा पर्याय आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात ते खत चालू वर्षात प्राप्त झाले नाही. त्यामुळे युरियाचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता कृषी आयुक्तालयाने खबरदारी घेतली. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ही तपासणी मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये खरिप हंगामात एप्रिल ते जुलै २०२० या काळात युरियाची जास्त खरेदी केलेल्या पहिल्या २० खरेदीदाराची तपासणी करण्यात आली. तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांच्या पथकाने तपासणी अहवाल तयार केले. संयुक्त पथकाने केलेल्या तपासणीत खरेदी करणाºयाकडे शेतजमिन नसणे, जमिन असली तरी गरजेपेक्षा अधिक युरिया खरेदी करणे, हा प्रकार युरिया खताचा काळाबाजार करण्यासाठीच झाला. त्यामुळेच हा प्रकार करणाºयाविरूद्ध कृषी विभागाने खत नियंत्रण आदेश १९८५ खंड-२(टी) तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२)(डी) या कलमानुसार कारवाई केली आहे. त्यामध्ये दोषी आढळलेल्या ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिला.
परवाना रद्द केलेले कृषी केंद्र
युरियाचा काळाबाजार केल्याने परवाने रद्द झालेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील रोहणा येथील आदित्य कृषी सेवा केंद्र, खामगाव येथील मुरारीलाल श्रीराम, तालुक्यातील लोखंडा येथील रेणुका कृषी सेवा केंद्र, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील संचित अॅग्रो सेंटर, बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील योगिराज कृषी सेवा केंद्र, जळगाव जामोद येथील किसान, मोताळा तालुक्यातील पोफळी येथील प्रतिक, शेंबा येथील अतुल अॅग्रो, मोताळा येथील सागर सीडस अॅण्ड फटीर्लायझर्स, लोणार तालुक्यातील बीबी येथील भांगडिया, संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथील कृष्णा कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे.