कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजारात सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक - डॉ. अविनाश सावजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 01:31 PM2019-02-16T13:31:30+5:302019-02-16T13:33:08+5:30
‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘कॅन्सर’ या आजाराला जगातील महाभयंकर आजारात गणले जाते. पंरतु, कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजाराला सकारात्मक दृष्टीकोन आणि भावनेने सामोरे गेल्यास, आजार बरा होण्यास बळ मिळते. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. ‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला. ‘कॅन्सर’ प्रबोधन यात्रेसाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.
‘कॅन्सर’या गंभीर आजाराच्या क्षेत्रातील समाजकार्याला सुरूवात कशी झाली?
- ‘जीवन शैली आणि आरोग्य’ हा विषय आपल्या आवडीचा राहीला आहे. हार्ट अॅटक, ब्लडप्रेशर आणि इतर आजारामध्ये आहार, विहार कसा असावा? याबाबत मार्गदर्शन करतानाच आचार-विचाराबाबतही समुपदेशन करायला सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षांच्या सेवाकार्यात लोक जुळत गेले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ‘कॅन्सर’या भंयकर आजाराच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले आहे.
‘कॅन्सर’ग्रस्ताला आधार देण्यासाठी आपले प्राधान्य कशाला?
- कॅन्सर या आजाराच्या रुग्णाला सर्जरी, केमो आणि रेडिओ थेरपी या तीन प्रमुख तांत्रिक बाबीसह मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज भासते. यामध्ये तांत्रिक बाबी वगळता मानसिक आधार आणि जीवन शैली आणि आरोग्यबाबत सकारात्मक समुपदेशन आणि सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी आपले प्राधान्य आहे.
‘कॅन्सर’ या आजारा विरोधात लढा देण्यासाठी उपाययोजनांबाबत काय सांगाल?
- ‘कॅन्सर’सारख्या गंभीर आजारा विरोधात लढण्यासाठी राज्यस्तरीय नेटवर्क तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासाठी अमरावती येथे गेल्यावर्षी राज्यातील २० जिल्ह्यातील कॅन्सर ग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावर्षी अहमद नगर ते अमरावती ‘कॅन्सर’प्रबोधन यात्रा काढण्यात आली. तसेच पुणे येथे देखील याचवर्षी कॅन्सर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांसमोर पुस्तक आणि उदाहणांसह सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत.
कॅन्सर आणि इतर आजारांमध्ये शासकीय उपाययोजनाबाबत अपेक्षा काय?
- कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम द्यावे. म्हणजे, त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना हमखास होईल. कॅन्सर सोबतच इतर गंभीर आजारांमध्येही याच पध्दतीचा शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विविध आजार आणि नैराश्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ‘आहार-विहार, आचार आणि विचार’ या चतुसुत्रींकडे शासन स्तरावरून प्रयत्न केले जाणे आवश्यक असल्याचेही डॉ. अविनाश सावजी म्हणाले.